सबका मंगल हो रूपाली पाटील
schedule01 Jan 25 person by visibility 459 categoryसामाजिक
एकाचा वाढदिवस लक्षात आला की त्या व्यक्तीने काय केले त्याचा इतिहास डोळ्यासमोर येतो. स्वतःसाठी जगत आहे की इतरांसाठीही त्याचं कार्य आहे याची पडताळणी लक्षात येते. रूपाली पाटील यांचा वाढदिवस एक जानेवारी आहे असं ज्यावेळी समजलं त्यावेळी त्यांच्याही कार्याचा उजाळा डोळ्यासमोर आला.
चुये (ता.करवीर) येथील शिक्षक जी.आर. पाटील यांच्या कुटुंब प्रमुख आणि चुलते यांच्या सहवासात रुपाली लहानाची मोठी झाली. इतर शालेय मुलींची स्वप्न असतात तसे तिचीही ती स्वप्न होती. शिकायचं मोठं व्हायचं अशी स्वप्न बघत असतानाच तिच्यावर अपंगत्वाचा आघात झाला. सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन तिच्या आजारपणावर मात केली. अपंगत्व विसरत विसरत तिने उभारण्याचा प्रयत्न केला.
गावात, कोल्हापुरात कुठेही खाजगी ठिकाणी काम करत आपलाही आर्थिक आधार असावा असं तिला वाटू लागलं. तिची धडपड बघून घरच्यांना सुद्धा दया येत होती. घरचे म्हणत होते 'तू काही करायची गरज नाही शांत बस कुठेही जाऊ नकोस.' तिची धडपड तिला शांत बसू देत नव्हती. शेवटी खाजगी नोकरी करत करत तिने जिल्हा कोर्टाच्या परीक्षेत यश मिळवत नोकरी कमावली.
नवसाआई जी. आर. पाटील सरांची आई. तिने मुलांचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ केला. तिने लावलेल्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालेले दिसतं. रूपालीचं अपंगत्व बघून तिने त्यावेळी तिच्या नावावर काहीतरी असावे म्हणून भांडून तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तुला काय हवं असेल तर माझ्याकडून घे असं सांगत रूपालीला कायमच आधार दिला. घरातील एका वंचित सदस्याला न्याय देण्याचं काम नवसा आईने केले. आई असतातच पुरोगामी विचाराच्या. मागे असणाऱ्यांना पुढे नेण्याचे काम त्या करत असतात. आमच्या आईने सुद्धा भाऊ व्यसनी असताना त्याला खूप आधार देण्याचा प्रयत्न केला त्याला जपलं. प्रत्येक आईचं असंच असतं मागे असणाऱ्यांना पुढे नेण्याचं काम करतात आणि पुढे जाणारा मात्र उगीच भांडत बसतो माझ्यासाठी काय केलं नाही म्हणून.
मित्र प्रेमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर वर्गातल्या कुठल्याही मुलांना किंवा वर्गातील कुणाला मदत करायची असेल, काही कार्यक्रम असेल तर सर्वाधिक मोठा वाटा उचलण्याचे काम कोण करत असेल तर त्या रूपाली पाटील करतात. अपंगावर मात करणाऱ्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा आपल्या हिश्यातील एक भाग देण्यात त्यांचा कायमच पुढाकार असतो. आता त्या देणारे असल्यामुळे गरजू देवांची संख्या सुद्धा त्यांच्यासमोर कायम दत्त असते. पण दान करणाऱ्या एका हाताची जाणीव दुसऱ्या हाताला होणार नाही याची दक्षता घेत त्या दानच करत असतात. दुसऱ्याला दान करण्याची श्रद्धा त्या कधीही ढळू देत नाहीत.
तसा तिचा कडक स्वभाव मात्र हळवा पणा सुद्धा तेवढाच. वृद्धाश्रमात दान करत असताना आधार तुटलेल्या त्या नातलगाणा बघून तिचे डोळे भरून येतात. त्यामुळे इतरांना आधार देण्याचं स्वप्न बाळगून त्या सध्या कार्यरत आहेत. ज्या कुटुंबांने मला आधार दिला ते कुटुंब माझ्यासाठी प्रथम असेल बाकीचे नंतर असंच त्यांचा विचार. मग आपल्याला कोणत्या गोष्टीचा त्याग करावा लागला तरीही त्या मागेपुढे बघत नाहीत.
नवसा आईपासून ते जी.आर पाटील त्यांचे बंधू, रूपाली पाटील यांचे बंधू या सर्वांना एकत्र बघितलं तर एका चित्रपटाला शोभेल असं एकत्रित कुटुंब नांदत असल्याचे एक जिवंत उदाहरण आहे. जी. आर. पाटील सर कुठे गेलीस कुठे जाणार अशी विचारणा करत हे माझं सर्वाधिक लाडक बाळ असं सांगायला सुद्धा मित्रमंडळींना विसरत नाहीत. बंधू विजय पाटील कामावर सुटल्यापासून ते जाण्यापर्यंत तिला काय आणण्यापासून ते तिच्या डोक्याला तेल लावण्यापर्यंत सर्व सेवा करायला कुठेही कमतरता करत नाही. बाकीचे पाच जण भाऊ तरी दीदीला काय करू, फिरायला जायचं काय, खायचं काय या सह इतर गोष्टीची कशाचीच कमतरता करत नाहीत.
पाटील गल्ली तरी रुपाली दीदीची फॅन. शेजारच्या काकीची केसाला तेल लावण्यापासून ते पोरांच्या शिक्षणापर्यंत सल्ला ते सकाळच्या नाष्टा, जेवण आणण्यापर्यंतची माया तिला मिळत असते. पाटील सरांच्या वरच्या घरापासून ते खालच्या घरापर्यंत सर्व मांसाहारी मंडळी. खाण्यापासून ते राहण्यापर्यंत सर्वांची उत्कृष्ट गोष्टीला पसंती. काकीचा फोन कुठे आले नाहीस. बंधू-भगिनींचा एकदा व्हिडिओ कॉल. घरचा काय कार्यक्रम असेल तर प्रमुख भूमिकेत रूपाली. आज नवसा आई असती तर रूपालीचा सांभाळ करा म्हणणारी रूपालीच इतरांना सांभाळणारी झाली आहे असं बघून तिलाही खूप कौतुक वाटलं असतं.
असंच आनंदी राहावं यामध्ये कोणतेही बाधा येऊ नये संतुलित राहावं सर्व या उद्देशाने त्या विपश्यनेला ही गेले असल्याचा सुद्धा समजतं. त्यामध्ये ध्यानापासून ते सर्वांचे चांगलं होण्यापर्यंत, आनंदात जास्त आनंदी होऊ नये तर दुःखात जास्त दुःख बाळगू नये, प्रत्येकाचा विकास होऊन प्रत्येकाला चांगल्या शुभेच्छा मिळाव्यात या दिशेने तथागत गौतम बुद्ध यांचे विचार पेरण्याचं काम केलं जातं. जगाला 'युद्ध नव्हे बुद्ध हवा' असे यासाठीच म्हटले जाते. सर्वच प्रेम करणाऱ्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या सबका मंगल हो या तथागतांच्या उद्देशाप्रमाणेच राहणाऱ्या रूपाली पाटील यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.
प्रशांत चुयेकर