सर्वसामान्य असूनही समाजसेवेचा ‘अनिल पवार पाचगावकर’ पॅटर्न!
schedule10 Sep 26 person by visibility 17 categoryसामाजिक
माणसांसोबतच मुक्या जीवांचीही काळजी; १५ वर्षांपासून अविरत सामाजिक कार्य
कोल्हापूर :आवाज इंडिया प्रतिनिधी
अनेक श्रीमंत व्यक्ती दानशूरपणे समाजासाठी मदतीचा हात पुढे करतात. त्यांच्या या दातृत्वाला नक्कीच सलाम करावा लागतो. मात्र, श्रीमंत नसतानाही आपल्या कुवतीनुसार समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड करणारा सर्वसामान्य माणूस जेव्हा दानशूर बनतो, तेव्हा तो समाजातील असंख्य लोकांसाठी प्रेरणास्थान ठरतो. असेच एक संवेदनशील आणि सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अनिल गजानन पवार (पाचगावकर).
माणूस आपल्या अडचणी बोलून सांगू शकतो, मदतीची मागणी करू शकतो. मात्र, मुक्या प्राण्यांना ना आपली व्यथा सांगता येते, ना आपली गरज व्यक्त करता येते. त्यांच्या भावना आणि वेदना समजून घेणाऱ्या प्राणीमित्रांची आज समाजाला गरज आहे. ही गरज ओळखून अनिल पवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून माणसांसोबतच मुक्या जीवांसाठीही आपले योगदान दिले आहे.
खाकी वर्दी घालून कुत्र्यांना बिस्किट वाटप
अनिल पवार यांच्या सामाजिक कार्यातील एक आगळावेगळा उपक्रम म्हणजे खाकी ड्रेस घालून भटक्या कुत्र्यांना बिस्किट वाटप करणे. पोलिसांचा खाकी गणवेश पाहून काही कुत्री भुंकत, प्रसंगी पोलिसांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न करत. त्यामुळे पोलिस आणि भटक्या कुत्र्यांमध्ये आपुलकीचे नाते निर्माण व्हावे, या भावनेतून पवार यांनी चक्क खाकी ड्रेस परिधान करून कुत्र्यांना बिस्किटे वाटली.
त्यांचा हा उपक्रम केवळ गंमतीचा नव्हता, तर माणूस आणि प्राणी यांच्यातील भीती कमी करून आपुलकी निर्माण करण्याचा संवेदनशील प्रयत्न होता.
भटक्या कुत्र्यांसाठी जाळी, स्मशानभूमीसाठी कपाट
शहरातील विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांसाठी सुरक्षितता आणि निवाऱ्याच्या दृष्टीने त्यांनी जाळी तयार करून दिली. तसेच स्मशानभूमीमध्ये आवश्यक साहित्य ठेवण्यासाठी कपाटाची व्यवस्था करून दिली. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करून त्यांचा उपयोग करण्याचा उपक्रमही त्यांनी राबविला.
शाळांनाही मदतीचा हात
समाजसेवा केवळ एका क्षेत्रापुरती मर्यादित न ठेवता त्यांनी शहरातील विविध शाळांना आवश्यक वस्तू भेट देऊन विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेतून अनेक उपयोगी वस्तू तयार करून त्या सार्वजनिक ठिकाणी वापरण्याची त्यांची संकल्पना विशेष कौतुकास्पद आहे.
मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडण्याचा संकल्प
अनिल पवार यांच्या समाजसेवेतील आणखी एक प्रेरणादायी बाजू म्हणजे त्यांनी आपल्या शरीराचे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी उपयोग व्हावा, या उदात्त भावनेतून त्यांनी शरीरदानाचे प्रमाणपत्र घेतले आहे. ‘माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर दान करावे’ असा स्पष्ट संदेश त्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही दिला आहे.
मांजरपोळ येथे मुक्या जीवांसाठी गवताचा आधार
मुक्या जनावरांविषयीची त्यांची आस्था केवळ बोलण्यापुरती मर्यादित नाही. मांजरपोळ येथे जनावरांसाठी महिन्यातून चार वेळा गवत भेट देण्याचा उपक्रम ते सातत्याने राबवत आहेत. गेल्या जवळपास १५ वर्षांपासून सामाजिक कार्याची ही वाटचाल सुरू असून, त्यामध्ये प्राणीसेवेलाही त्यांनी महत्त्वाचे स्थान दिले आहे.
समाजसेवा ही श्रीमंतीवर नव्हे, तर मनाच्या श्रीमंतीवर अवलंबून
अनिल गजानन पवार पाचगावकर यांचे कार्य एक महत्त्वाचा संदेश देते—दान करण्यासाठी केवळ पैसा असण्याची गरज नाही; त्यासाठी संवेदनशील मन आणि मदतीची इच्छा असणे महत्त्वाचे आहे. आपल्या कुवतीनुसार समाजासाठी काहीतरी देत राहणे, मुक्या जीवांची वेदना समजून घेणे आणि मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडण्याचा विचार करणे, हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे.
गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या अपेक्षेशिवाय सातत्याने सुरू असलेल्या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल आज परिसरातील नागरिक घेत आहेत. माणुसकी, प्राणीप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि दातृत्व यांचा सुंदर संगम असलेले अनिल गजानन पवार पाचगावकर हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी समाजसेवक ठरत आहेत.