माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
schedule04 Aug 26 person by visibility 13 categoryराजकीय
कोल्हापूर – माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील यांचे आज सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले आहे. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने शिक्षण, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
२२ ऑक्टोबर १९३५ साली कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप या छोट्याच्या गावात डॉ. डी.वाय. पाटील यांचा जन्म झाला होता. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठं काम केलंय. अनेक शिक्षण संस्था सुरु करून त्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा विद्यार्थ्यांसाठी खुली केली. त्यांच्या दूर दृष्टीने असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या होत्या. त्यांचे वडील स्वर्गीय यशवंतराव भाऊराव पाटील हे नामवंत शेतकरी होते. वडिलांचा अध्यात्म, शेती, सहकार, शिक्षण क्षेत्रातील वारसा त्यांच्या पुढील पिढीने समर्थपणे चालवला आहे. डॉ. डी.वाय. पाटील यांनी वयाच्या १९ व्या वर्षी कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटीचे अध्यक्ष पद भूषवले. या माध्यमातून त्यांनी स्थानिक शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांसाठी भरीव काम केलं. १९५७ मध्ये कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे एकमेव नगरसेवक म्हणून ते निवडून आले. १९५७ ते १९६२ या काळात त्यांनी कोल्हापूरचे नगरसेवक म्हणून काम पाहिले होते.१९६१ ते ६२ या काळात ते कोल्हापूर बाजार समितीचे ते चेअरमन होते. १९६७ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले होते. १९७५ ते ९४ या काळात ते गारगोटीतील मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष होते. या विद्यापीठात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विविध अभ्यासक्रमांना मान्यता मिळवून दिली होती. मुंबई आणि पुणे विद्यापीठात ते सिनेट सदस्य म्हणून कार्यरत होते. १९८९ ते ९४ या काळात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी जवळपास १५० मंदिरांचा जिर्णोद्धार करून ती मंदिरे पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास आणली. त्रिपुरा आणि बिहार राज्याचे ते राज्यपाल ते होते. तसेच त्यांनी पश्चिम बंगालचा अतिरिक्त कार्यभारही समर्थपणे सांभाळला होता. शिक्षण आणि समाजसेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना पद्मश्री या सर्वाच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.
अमेरिकेतील अॅरीझोना विद्यापीठाने डॉ. डी.वाय. पाटील यांचा शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल डी. लीट देवून गौरव केला आहे. नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठाने डॉक्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रॆशन हा पुरस्कार प्रदान केला आहे.
मागच्या सहा महिन्यांपासून त्यांची प्रकृती हळूहळू खालावत चालली होती. घरातूनच त्यांच्यावर उपचार सुरू होते. अगदी 20 दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र त्यातून ते सावरत होते. अशातच 3 ऑगस्ट रोजी दिवसभरात त्यांची प्रकृती खालावत गेली आणि 4 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बुधवार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत त्यांच्या कसबा बावडा इथल्या 'यशवंत निवास' स्थानी ठेवण्यात येणार आहे.
बुधवारी सायंकाळी 4 वाजता यशवंत निवास येथून डॉ. पाटील यांची अंत्ययात्रा निघणार असून, सायंकाळी 5 वाजता कसबा बावड्यातील लाईन बाजार इथल्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक मार्गदर्शक आणि आधारस्तंभ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.