* डॉ. डी. वाय. पाटील यांनी गुणवत्तेची संस्कृती निर्माण केली
schedule06 Aug 26 person by visibility 7 category
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात शोकसभा
कोल्हापूर : आवाज इंडिया
माजी राज्यपाल तथा डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांचे विचार, कार्य अमर आहे. त्यांच्या मूल्यांचा आणि विचारांचा वारसा विविध क्षेत्रांत पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी भावना व्यक्त केल्या. विद्यापीठात आयोजित शोकसभेत विविध मान्यवरांनी डॉ. डी. वाय. पाटील यांना आदरांजली वाहिली.
माजी राज्यपाल, डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल विद्यापीठात गुरुवारी शोकसभा झाली.
डॉ. शर्मा म्हणाले , डॉ. डी. वाय. पाटील यांनी केवळ संस्था उभारल्या नाहीत, तर उत्कृष्टता आणि गुणवत्तेची संस्कृती निर्माण केली. हजारो विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे जीवन त्यांनी घडवले. प्रत्येकाला नावाने ओळखण्याची त्यांची विलक्षण स्मरणशक्ती आणि प्रत्येकाशी असलेला वैयक्तिक जिव्हाळा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या मूल्यांचा आणि विचारांचा वारसा अधिक ताकदीने पुढे नेऊया.
कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले म्हणाले, ‘फुलाला फुलण्यात, कळीला उमलण्यात आणि माणसाला जगण्यात आनंद असला पाहिजे’ हा दादासाहेबांचा जीवनदृष्टिकोन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ते वटवृक्षासारखे आश्रयदाते, आशेचे किरण, दातृत्वाची मूर्ती आणि ज्ञानाचा अथांग महासागर होते. शिक्षण क्षेत्रातील महामेरू म्हणून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा म्हणाले, देशाच्या विकासासाठी शिक्षण हाच सर्वात मोठा मार्ग असल्याचा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली प्रत्येक संस्था नव्या उंचीवर पोहचली.
अंतर्गत दर्जा हमी कक्षाच्या संचालिका डॉ. शिंपा शर्मा म्हणाल्या, समाजपरिवर्तनासाठी त्यांची अखंड धडपड, प्रत्येक व्यक्तीशी जुळणारा संवाद आणि तालमीचा आखाडा ते राज्यपालपदापर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनेकांसाठी आदर्श आहे.
सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम म्हणाल्या, दादासाहेबांनी एका आयुष्यात असंख्य आयुष्य घडवली. ज्ञान, नम्रता आणि सेवाभावाचे विचार त्यांनी समाजाला दिले. हजारो कुटुंबांना रोजगार, शिक्षण आणि नवे आयुष्य देणारे ते खरे कर्मयोगी होते.
वैदयकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी त्यांच्या शिकवणी व मार्गदर्शनामुळे आयुष्यभर योग्य दिशा मिळत राहील, असे सांगितले.
उपकुलसचिव संजय जाधव यांनी चार दशकांच्या सहवासातील आठवणी सांगितल्या. दादासाहेबांनी कधीही कोणावर टीका केली नाही, उलट प्रत्येकाला धाडस, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार दिल्याचे त्यांनी सांगितले.
नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्य मनीषा विजापूरकर, सेंटर फॉर इंटर डीसीप्लेनरी स्टडीजच्या डॉ. अर्पिता पांडे -तिवारी, फिजिओथेरपीच्या डॉ. अमृता डोईजड, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, स्कूल ऑफ हॉस्पिटीलीटीचे प्राचार्य रुधिर बारदेसकर, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनीही यावेळी भावना व्यक्त केल्या.
यावेळी दोन मिनिटे मौन पाळून डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.