गोकुळ निवडणुकीसाठी कोल्हापूर खंडपीठाने वाढीव कालावधी द्यावा – माणिक पाटील (चुयेकर)
schedule31 Jul 26 person by visibility 21 categoryराजकीय
कोल्हापूर:
सहकार कायद्यातील निवडणूक विषयक नियमांमुळे कोल्हापूर सर्किट बेंचने ठरवून दिलेल्या ९० दिवसांच्या कालावधीत 'गोकुळ'ची निवडणूक घेणे शक्य नाही. त्यामुळे या निवडणुकीसाठी विभागीय सहकार उपनिबंधकांना आवश्यक तो कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी श्रीराम दूधसंस्था, चुये चे संचालक तथा 'पदवीधर मित्र'चे संस्थापक-अध्यक्ष माणिक पाटील (चुयेकर) यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे नमूद केले आहे की, फडणवीस सरकार दीर्घकाळासाठी स्वतःच्या सोयीच्या लोकांचे खासगी प्रशासक मंडळ गोकुळवर नेमले, या अनावश्यक भीतीपोटी मागील संचालक मंडळाने मुदत संपल्यानंतर लगेचच निवडणूक घेण्याची मागणी उच्च न्यायालयात केली होती. त्यावर निकाल देताना न्यायालयाने निवडणुका ९० दिवसांच्या आत घेण्याचा निर्णय दिला होता.
परंतु, सहकार कायद्यातील निवडणूकविषयक नियमानुसार या निवडणूक प्रक्रियेस आवश्यक तो कालावधी न दिल्यास गोकुळ निवडणुकीचा अंतिम निकाल कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतो. यामुळे काही सभासद सर्वोच्च न्यायालयापर्यंत जातील आणि नवीन संचालक मंडळ स्थापन होण्यास प्रदीर्घ कालावधी जाईल, असा इशाराही माणिक पाटील यांनी या प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.