जिल्हा परिषदेत गणेशोत्सव रद्द करू नका; सदस्यांची अध्यक्षांकडे मागणी
schedule27 Aug 26 person by visibility 26 categoryराजकीय
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेली गणेशोत्सवाची परंपरा यंदाही कायम ठेवावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव, अतिश नंदकुमार शिगे, इंद्रजित पाटील व क्रांतीसिंह धनंजय पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन दिले.
जिल्हा परिषदेत २००४ पासून उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र, यंदा गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. हा निर्णय भावनिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या जनतेच्या भावना दुखावणारा असल्याचे सदस्यांनी निवेदनात म्हटले आहे.
गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींच्या सहभागातून गणेशोत्सव भक्तिमय आणि शांततेत साजरा होत आहे. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव ही परंपरा खंडित करू नये, अशी भूमिका सदस्यांनी मांडली.
यंदाचा गणेशोत्सव रद्द न करता भक्तिमय वातावरणात साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घ्यावा, तसेच धार्मिक व सांस्कृतिक परंपरा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक सहकार्य करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.