आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रा. तुळशीदास हरी कांबळे यांची निवड
schedule04 Sep 26 person by visibility 8 categoryशैक्षणिक
गारगोटी : ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या संयुक्त प्रशिक्षण केंद्र, श्री मौनी विद्यापीठ, गारगोटी, जि. कोल्हापूर येथे गेल्या वीस वर्षांपासून उल्लेखनीय सेवा बजावणारे प्राध्यापक तुळशीदास हरी कांबळे, उपप्राचार्य यांची कृती फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक-शिक्षिका पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
प्रा. कांबळे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात प्रशिक्षण व प्रशासकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांअंतर्गत विस्तार अधिकारी संवर्गातील अधिकारी-कर्मचारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक व वरिष्ठ सहाय्यक यांच्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते.
तसेच विविध शासकीय विभागांतील अधिकारी, कर्मचारी आणि सन्माननीय पदाधिकाऱ्यांसाठीही प्रशिक्षण कार्यक्रम या केंद्रामार्फत राबविले जातात. प्रशिक्षणार्थींना प्रशासकीय कामकाज, ग्रामविकास, जलसंधारण तसेच शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शन करण्यामध्ये प्रा. कांबळे यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.
वीस वर्षांची प्रदीर्घ सेवा, प्रशिक्षण क्षेत्रातील योगदान, प्रशासकीय ज्ञानाचा प्रभावी वापर आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलेले मार्गदर्शन या कार्याची दखल घेत कृती फाउंडेशनने त्यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या निवडीबद्दल प्रा. तुळशीदास हरी कांबळे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.