अंधत्वावर मात करत त्रिशला शहा यांचा सामाजिक कार्याचा जागर; १५० शाळांमध्ये वैज्ञानिक प्रबोधन
schedule05 Mar 26 person by visibility 19 categoryशैक्षणिक
कोल्हापूर :
दृष्टी नसली तरी जिद्द आणि ध्येयवादाच्या जोरावर माणूस आभाळाला गवसणी घालू शकतो, हे मिरज येथील त्रिशला शांतीलाल शहा यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. ९० टक्के अंधत्व असूनही, गेल्या १३ वर्षांपासून त्या अंधांचे बचत गट चालवण्यापासून ते विज्ञानाचा प्रचार करण्यापर्यंत विविध क्षेत्रात सक्रिय आहेत.
राज्यातील पहिल्या अंध बचत गटाची स्थापना
नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड (NAB), मिरज या संस्थेच्या माध्यमातून त्रिशला शहा यांनी महाराष्ट्रातील अंधांचा पहिला बचत गट सुरू केला. या माध्यमातून त्या अंध बांधवांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. स्वतः पापड, खाकरा आणि फाफडा तयार करून तसेच महाबळेश्वर येथून मेणबत्त्या आणून त्यांची विक्री करून त्या इतरांसमोर एक आदर्श उभा करत आहेत.
'हसत-खेळत विज्ञान' आणि सामाजिक प्रबोधन
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील १५० शाळांमधून सुमारे २०,००० विद्यार्थ्यांसमोर 'हसत-खेळत विज्ञान' हा नाट्यप्रयोग सादर केला आहे. याशिवाय:
'स्त्रिया आणि अंधश्रद्धा' या विषयावर भारूड आणि गाण्यांच्या माध्यमातून ६५ हून अधिक महिला मंडळांमध्ये प्रबोधन केले.
साहित्य क्षेत्रातही ठसा: ७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (सातारा) निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग होता.
डिजिटल सेवा: ऑडिओ बुक्स व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून त्या अंध व्यक्तींसाठी कवितांचे रेकॉर्डिंग पोहोचवत आहेत.
पुरस्कारांनी कार्याचा गौरव
त्यांच्या या अष्टपैलू कार्याची दखल घेत त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे:
उद्योग प्रेरणा पुरस्कार (सांगली अपंग संस्था)
प्रेरणा पुरस्कार (सांगली महानगरपालिका)
समाजरत्न पुरस्कार (सिद्धकला संस्था, जयसिंगपूर)
कै. प. रा. आर्डे स्मृती प्रेरणा पुरस्कार (अंनिस)
कोरोना काळातील उत्कृष्ट कवितेसाठी सांगली महापालिकेचा प्रथम पुरस्कार.
त्रिशला शहा यांनी आपल्या मर्यादांचे रूपांतर शक्तीत केले असून, त्यांच्या या प्रवासाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.