कामगिरी दाखवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा’ जि.प प्रशासनाला इशारा
schedule30 Apr 26 person by visibility 18 categoryराजकीय
जिल्हा परिषदेत ४ वर्षांनंतर ऐतिहासिक 'स्थायी समिती' सभा; ग्रामीण प्रश्नांवर जोरदार चर्चा
कोल्हापूर:
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि पदाधिकारी निवडीनंतर, तब्बल ४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अधिकारी आणि पदाधिकारी यांची संयुक्त 'स्थायी समिती' सभा पार पडली. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पा शशिकांत खोत यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. या सभेत ग्रामीण भागातील जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सागोपांग चर्चा करण्यात आली.
चार वर्षांनंतर झालेल्या या बैठकीत प्रशासनाला ‘कामगिरी दाखवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा’ असा स्पष्ट इशारा देत जिल्हा परिषदेत नव्या कार्यपद्धतीची सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले.विकासकामांवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पा शशिकांत खोत, उपाध्यक्ष श्री. तानाजी पाटील यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. ्यामध्ये . अमर पाटील, श्री. अभिजित तायशेट, श्री. सग्रामसिंह कुपेकर, श्री. सुधीर देसाई, श्री. अमरसिंह यशवंत पाटील, श्री. महेश पाटील, सौ. रेश्मा राहुल देसाई, श्री. जयंत पाटील आणि श्री. शिवाजी मुरलीधर जाधव यांनी विशेष सहभाग नोंदवला..
सभेच्या प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमप्रकाश यादव यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे 'गाभा ग्रामविकासाची' हे पुस्तक आणि रोप देऊन स्वागत केले.
महसूल, कृषी आणि पाणी पुरवठा विषयांवर जोरदार चर्चा
सभेत सदस्यांनी ग्रामीण भागातील जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडली. निधी परत जाणार नाही यांची काळजी घेण्याच्या सूचना अमर पाटील यांनी दिल्या.
अतिक्रमण आणि वन विभाग: १ जानेवारी २०११ पूर्वीची शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमित करण्याबाबतच्या 'जीआर'नुसार कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी पुढील सभेला वन विभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्याचे निर्देश देण्यात आले.
कृषी विभाग: ग्रामीण भागात खतांची टंचाई भासत असून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी श्री. सुधीर देसाई यांनी केली. तसेच, शेतकऱ्यांना पेरणीनंतर बियाणे मिळण्याऐवजी पेरणीपूर्वीच बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना श्री. अमरसिंह यशवंत पाटील यांनी दिल्या.
पाणी टंचाई: टंचाईग्रस्त गावांचा समावेश पाणी पुरवठ्याच्या पुरवणी आराखड्यात करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या सूचना उपाध्यक्ष श्री. तानाजी पाटील यांनी दिल्या. श्री. महेश पाटील यांनी जल जीवन मिशन अंतर्गत काही योजनांचे अंदाजपत्रक ५ कोटींच्या मर्यादेत ठेवण्याच्या तांत्रिक चुकीमुळे गावांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सौ. रेश्मा राहुल देसाई यांनी गारगोटी पाणी पुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
आरोग्य विभाग: बोरपाडळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम अपूर्ण असल्याचा मुद्दा श्री. जयंत पाटील यांनी मांडला. तर आरोग्य विभागातील कंत्राटी भरतीमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा असल्याने, संबंधित मक्तेदाराची खात्री करून सध्याच्या नियुक्त्या थांबवण्याची मागणी श्री. अभिजित तायशेटे यांनी केली. रेंदाळ उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र करावे, अशी मागणी शिवाजी मुरलीधर जाधव यांनी केली.
ग्रामविकास योजना: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या योजनेची योग्य प्रसिद्धी झाली नसल्याने ती ग्रामीण भागापर्यंत पोहोचली नाही. याकरिता सरपंच व सदस्यांसाठी कार्यशाळा घेण्याची सूचना श्री. सग्रामसिंह कुपेकर यांनी केली.
गैरहजर अधिकारी: सभेला अनुपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन खुलासा मागवण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले.
या सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संतोष जोशी यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. सर्व सदस्यांच्या प्रश्नांना प्रशासनाकडून सविस्तर उत्तरे देण्यात आली आणि सभा अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली.
🔹 अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाई
बैठकीस गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस देऊन खुलासा मागवण्याचा इशारा अध्यक्षा खोत यांनी दिला.
यावेळी महिला बालकल्याण सभापती विद्या विलास पाटील उपस्थित होत्या.