महानगरपालिकेचा किटकनाशक विभागावर कारवाईची फवारणी कधी
schedule13 Aug 24 person by visibility 224 category
कोल्हापूर ; (प्रशांत चुयेकर)
महानगरपालिकेचा किटकनाशक विभाग संशयाच्या भोवर्यात सापडला आहे. रोगराईचे प्रमाण वाढले असून याबाबत कोणतीही काळजी या विभागाला नसल्याचे दिसत आहे. याबाबत महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
महानगरपालिके अंतर्गत कीटकनाशक विभाग कार्यरत आहे. या विभागाच्या वतीने शहरात विविध ठिकाणी रोगराई नष्ट व्हावी म्हणून धूर फवारणी केली जाते. माजी नगरसेवक किंवा पदाधिकारी यांचा फोन आल्यावरच या विभागातील कर्मचारी त्या ठिकाणी जात असतात. फोन आला नाही तर कोणत्या ठिकाणी हे धूर फवारणी करतात याचा पत्ता ना विभागाला आहे ना प्रशासनाला.
दररोज वापरले जाणारे डिझेल, पेट्रोल व फवारणीसाठी लागणारे औषध याचा कोणताही हिशोब ठेवला जात नाही. किती फवारणी करायची याबाबतची माहिती विभाग प्रमुख जयंत पवार यांना नाही. याबाबतची माहिती विचारले असता दररोज एक फेर होत असल्याचं त्यांनी सांगितलं.मात्र कोणाकडे किती लिटर पेट्रोल, डिझेल, औषध वापरले जाते दररोज वापरले जाते का याची माहिती नाही.
या विभागात एक झाडू कामगार विभागाची पाहणी करत आहे. त्याच्याच हातात सर्व कंट्रोल आहे. दररोज लागणारे 16 लिटर डिझेल दोन लिटर पेट्रोल या विभागातील आठ कर्मचाऱ्यांना दिले जाते. हे कर्मचारी तेवढ्या साधनाचा वापर न करता निवळ फोटो काढण्यात धूर काढायचा आणि परत गाडी आणून लावायची असा राजरोस कार्यक्रम सुरू आहे.
याबाबतची रीतसर माहिती घेऊन कामचुकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व विभाग प्रमुखांच्या निष्क्रियतेच्या रोगावर कारवाईचा फवारा मारला जात नाही तोपर्यंत शहरात रोगराई वाढतच राहणार आहे.