राधानगरीतील फालेवाडा येथील खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
schedule08 May 26 person by visibility 21 categoryगुन्हे
कोल्हापूर (प्रतिनिधी):
राधानगरी तालुक्यातील कोनोली पैकी फालेवाडा येथे शेतजमिनीच्या वादातून झालेल्या सूरज पांडुरंग फाले यांच्या खून प्रकरणातील फरार आरोपी बापू धोंडीराम फाले (वय २१) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) गुरुवारी सापळा रचून अटक केली. कोल्हापूर रिंगरोडवरील गंगाई लॉन परिसरात ही कारवाई करण्यात आली.
घटनेची पार्श्वभूमी:
दिनांक २ मे २०२६ रोजी जमिनीच्या वाटणीच्या कारणावरून धोंडीराम बापू फाले व मृताच्या कुटुंबात वाद झाला होता. याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी सोनिया सूरज फाले आणि त्यांचे पती सूरज फाले यांना काठ्या व कोयत्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने सूरज फाले यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा (गु.र.नं. १३८/२०२६) दाखल करण्यात आला होता.
अशी झाली कारवाई:
गुन्हा घडल्यापासून आरोपी बापू धोंडीराम फाले हा फरार होता. पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल यांनी या फरार आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना दिल्या होत्या. शोध सुरू असताना, पोलीस अंमलदार शुभम संकपाळ यांना आरोपी कोल्हापूर येथील गंगाई लॉनजवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव यांच्या पथकाने ७ मे २०२६ रोजी त्या ठिकाणी सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. पकडलेला आरोपी सध्या शिंगणापूर (ता. करवीर) येथील एस.टी. कॉलनी परिसरात राहत होता. अटकेनंतर त्याला पुढील तपासासाठी राधानगरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालींदर जाधव आणि त्यांच्या पथकातील शुभम संकपाळ, लखन पाटील, सागर माने, विजय इंगळे व अन्य कर्मचाऱ्यांनी केली आहे.