कॉम्रेड गोविंद पानसरे विचार संमेलन कोल्हापुरात डॉ. भारत पाटणकर उद्घाटक तर डॉ. कपिल राजहंस संमेलनाध्यक्ष
schedule08 May 26 person by visibility 9 categoryशैक्षणिक
कोल्हापूर (आवाज इंडिया प्रतिनिधी) : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या अनुषंगाने महाराष्ट्रभर वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे विचार बहुजन समाजासाठी व त्यांच्या विकासासाठी उपयुक्त असेच होते. सर्वसामान्य माणसांच्या बाजूने त्यांचा आवाज बुलंद करण्याचे काम कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या विचारसरणीला मान्य असणाऱ्या अनेकांनी केले आहे. त्यांचे विचार समजून घेणे व त्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणे ही महत्त्वाची भूमिका घेऊन मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि सत्यशोधक इतिहास परिषद यांच्या वतीने पहिले कॉम्रेड गोविंद पानसरे विचार संमेलन मंगळवार, दि. 12 मे, 2026 रोजी सकाळी 11:00 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख आणि संमेलनाच्या निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर आणि आदित्य म्हमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इतिहास संशोधक आणि लेखक डॉ. कपिल राजहंस सदर संमेलनाचे संमेलनाध्यक्ष असतील तर ज्येष्ठ दिशादर्शक विचारवंत व श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर हे या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत.
स्वागताध्यक्ष आंबेडकरवादी नेते उत्तमदादा कांबळे, प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने, कवी संमेलनाध्यक्ष विद्रोही कवी पि. के. यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत असलेल्या या विचार संमेलनाचे सहनिमंत्रक विश्वासराव तरटे, अभिजीत मासुर्लीकर, गंगाधर म्हमाने, अर्हंत मिणचेकर, बाल निमंत्रक आदित्य म्हमाने, दुर्वा राजहंस, दिक्षा तरटे, अमिरत्न मिणचेकर, शिवतेज राजहंस हे आहेत.
सदर विचार संमेलनास महाराष्ट्रातील विविध भागातून लेखक, साहित्यिक, विचारवंत व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कॉम्रेड गोविंद पानसरे विचार संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विश्वासराव तरटे यांनी केले आहे.