कोरोना व शिक्षणक्षेत्रातील आव्हाने व बदल:
schedule27 Aug 20 person by visibility 1458 categoryसंपादकीय
जगभरात कोरोनाचा थैमान सुरू असतानाच आरोग्याच्या प्रश्नाबरोबरच शिक्षणाचा सुध्दा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोरोना चा परिणाम अर्थव्यवस्थेवर झालेला आहेच त्याच बरोबर सामाजिक, औद्योगिक , राजकीय, सांस्कृतिक व भौगोलिक इत्यादी घटकावर झालेला आहे. जगभरातील विविध देश, जागतिक आरोग्य संघटना, विविध संशोधन करणाऱ्या संस्था कोरोनाच्या लसीबाबत दिवस-रात्र संशोधन करीत आहेत त्यामुळे लवकरच लस येईल. पण पुन्हा एकदा आरोग्य क्षेत्रात दर्जेदार संशोधनाचे महत्त्व अधोरेखित होत आहे व दर्जेदार संशोधन करणाऱ्या संस्थांची सुध्दा गरज भासत आहे शिक्षणाचे व संशोधनाचे महत्व आधोरिकेत होत आहे. शिक्षणामुळे समाजाचा विकास होतो त्यामुळे पुन्हा एकदा चांगल्या शिक्षण पद्धतीलाही महत्व प्राप्त झाले आहे.
भारतीय शिक्षण पद्धतीचा विचार करता भारतीय भूमीला शिक्षणाचा चांगला इतिहास आहे. जगप्रसिद्ध असणारी नालंदा व तक्षशिला या सारखी विद्यापीठे याच भूमीत होती व त्याने त्या कालखंडामध्ये दर्जेदार शिक्षण दिले. या विद्यापीठातून धर्मशास्त्र, गणित शास्त्र व तर्कशास्त्र अशा विविध विषयावर शिक्षण दिले. गुरुकुल पद्धती ही आपलेकडे होती व त्या माध्यमातून ही शिक्षण देण्याचे काम सुरू होते. पुढच्या कालखंडामध्ये समाजव्यवस्थेमध्ये बदल झाला वर्ण व्यवस्थेमुळे शिक्षण पध्दती विशिष्ट वर्गासाठी सीमित झाली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र या वर्ण व्यवस्थेमध्ये शिक्षणाचा हक्क हा एका ठराविक वर्गासाठी होता. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये ब्रिटिशांनी शिक्षण पद्धती विकसित केली. लॉर्ड विल्यम बेंन्टिक व थॉमस मॅकेली आणि इंग्रजी भाषेतून शिक्षण पद्धती विकसित केली. मद्रास प्रेसिडेन्सी, बॉम्बे प्रेसिडेन्सी, बेंगाली प्रेसिडेन्सी या ठिकाणी शिक्षण व्यवस्था विकसित झाली. भारतातील पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये भिडे वाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये सुरू केली. भारतीय शिक्षण व्यवस्थेमधील ते सगळ्यात मोठे पाऊल होते.
कोल्हापूरचे राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी ही आपल्या संस्थानांमध्ये शिक्षणाचे महान कार्य केले. भारतातील विविध समाजसुधारकांनी शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले व शिक्षणाचे कार्य ही केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाबद्दलचे विचार आजही अनेकांना दिशा देण्याचे काम करतात व प्रेरणाही देतात. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य महत्वाचे आहे. 1950 मध्ये प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून शिक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला व त्या माध्यमातून भारतीय शिक्षण पद्धती विकसित केली जावू लागली. विद्यापीठ अनुदान आयोग (१९५३) स्थापन करून उच्च शिक्षणाला चालना देण्यात आली. या माध्यमातून महाविद्यालय, विद्यापीठे स्थापन करण्यात आली. शिक्षणाबरोबरच संशोधनावर ही भर देण्यात आला. कौशल्य प्रधान शिक्षण सुद्धा विकसीत करण्यात आले. विविध प्रकारच्या आयआयटी यांची स्थापना सुद्धा करण्यात आली. शेती विषयी शिक्षण तसेच दूर शिक्षणाचा पर्यायही खुला करण्यात आला व शिक्षणाची गंगा दारोदारी चांगल्या पद्धतीने नेण्याचे काम सुरू झाले. महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था व इतर भागातील लहान मोठ्या शिक्षण संस्था निर्माण झाल्या व त्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागले. शिक्षण संस्था निर्माण करीत असताना त्यावेळचा हेतू दर्जेदार शिक्षण देणे हाच होता. अलीकडे मात्र शिक्षण क्षेत्रामध्ये बरेच बदल झालेचे दिसून येते आहेत. कोरोना काळात दर्जेदार शिक्षणाची गरज असताना शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवणे हेच मोठे आव्हाण आहे. दर्जेदार शिक्षकांची निवड, तंत्रज्ञान अवगत असणारे शिक्षक यांची निवड करणे गरजेचे बनले आहे. तसेच जे आधीचे आहेत त्याना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे.
शासकीय पातळीवरची उदासीनता, शासकीय बाबूंची वाढती मक्तेदारी , विनाअनुदानित व त्यांचे धोरण, निवृत्तीच्या वयाचा प्रश्न, शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे यांच्या स्वायत्ततेचा व अधिकाराचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न, तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांचा प्रश्न, प्रशासकीय कर्मचाऱ्याचा प्रश्न, शाळासाठी मिळणारे अनुदान, महाविद्यालयांना पगार सोडून मिळणारे अनुदान यांचा ही प्रश्न मोठा आहे तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा ही प्रश्न आहे पण त्यावर जास्त विचार होत नाही किंवा त्या प्रश्नाची दखल ही घेतली जात नाही. गेले दहा बारा वर्षात त्यावर लक्ष ही नाही व भरती प्रक्रियाही नाही त्यामुळे ऑनलाईन दर्जेदार शिक्षण कसे द्यायचे हाही प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना काळात उभा आहे. काही ठिकाणी विषय शिकवायला शिक्षकच नाहीत त्या ठिकाणी शिक्षण कसे द्यायच हा प्रश्न आहे. मुळात शिक्षणावर केलेला खर्च हा वाया जात नाही तो समाजाच्या विकासासाठी किंवा समाजनिर्मितीसाठी उपयोगी पडतो पण उदासीनता धोरणामुळे शिक्षण क्षेत्रावर या कोरोना कालखंडात गंभीर परिणाम दिसत आहे व विविध प्रश्न या क्षेत्रात उभे राहिले आहेत पण त्यावर उघडपणे चर्चा होत नाही. शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेली ठरावीक मक्तेदारी या व्यवस्थेला घातक आहे.
भरती प्रक्रिया व त्या संदर्भातील विषय ही सध्या महत्त्वाचे आहेत व त्यावर मार्ग काढणे हे गरजेचे बनले आहे तरच आपण दर्जेदार शिक्षण देऊ शकतो. असे अनेक विषय असले तरी चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे व त्यातून समाजाचा विकास कसा होईल हे सुध्दा पाहणे अपेक्षित आहे. शिक्षण क्षेत्रात सध्या समस्या असतील ही पण त्यावर मार्गही काढावा लागेल. सध्या चांगले व गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले तरच शाळेमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी घडतील व समाजाच्या विकासाला मदत ही होईल. सध्या ऑनलाईन शिक्षण व्यवस्था विकसित होऊ लागली आहे शहरी भागामध्ये काही प्रमाणात ऑनलाइन शिक्षण पध्दती विकसित होऊ शकते. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मध्ये अडचणी येऊ शकतात, आदिवासी पाड्यावर, वाड्या वस्त्यावर जिथे अजून लाईटच गेलेली नाही त्याभागात जिथे मोबाईला रेंज येत नाही तिथे शिक्षण कसे पोहचवायचे हे ही मोठे आव्हान असेल. जिथे दोन वेळचे पोट भरण्यासाठीचा प्रश्न असतो तिथे टीव्ही मोबाईल, टॅब व तंत्रज्ञांनाच्या वस्तु कश्या प्रकारे विकत घ्यायच्या हाही प्रश्न निर्माण होत आहे. पाटी व पेन्सील बरोबर टॅब ची सोय करावी लागते काय हा ही प्रश्न निर्माण झालेला आहे. पण शिक्षण प्रणाली तर विकसित करण्याची आवश्यकता आहेच ऑनलाइन पद्धतीने किती वेळ शिक्षण द्यायचे त्याचे निकष ठरवले जात आहेत.
नवीन बदलाला सामोरे जावेच लागेल जिथे शिक्षण नाही तिथे शिक्षण व्यवस्था विकसित करावी लागेल. आधुनिक शिक्षणामध्ये मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर यांनी जागा घेतली आहे. डिजिटल शिक्षण व्यवस्थेकडे थोडे थोडे पाऊल आपण टाकत आहे पण त्या शिक्षणात ही धोके आहेतच पण सध्या दुसरा पर्यायही नाही व त्या माध्यमातून शिक्षण द्यावे तर लागेलच. सक्षम आधुनिक व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. विविध प्रकारच्या चाचण्या ऑनलाइन घ्याव्या लागणार आहेत. परिक्षा सुध्दा आॅनलाईनच होणार त्यामुळे गुणवत्ता असणारे, तंत्रज्ञानाची माहिती असणारे, संशोधन करणारे संशोधक व शिक्षक यांची गरज निर्माण झाली आहे. सध्या सगळीकडे ओरड आहे चांगले संशोधन होत नाही कोरोनामुळे पुन्हा चांगल्या संशोधनाची संधी निर्माण झालेली आहे. कोरोनामुळे कृषी क्षेत्रावर झालेला परिणाम असेल, शिक्षण व्यवस्थेवर झालेला परिणाम असेल, राजकीय क्षेत्रावर झालेला परिणाम असेल, लोकसंख्या वर झालेला परिणाम असेल, बदलत्या जीवन शैली वर झालेला परिणाम असेल, विज्ञान व तंत्रज्ञान यावर झालेला परिणाम असेल अशा विविध क्षेत्रावर जो काही परिणाम झाला आहे त्यांचा अभ्यास करण्यासाठी संधीही निर्माण झालेली आहे. आज पुन्हा गरज निर्माण झाली आहे शाळेमध्येसुध्दा, महाविद्यालय स्तरावर, विद्यापीठ स्तरावर, शासकीय विभागांमध्ये संशोधन कक्ष विकसित होणे गरजेचे आहे तिथे संशोधकांची निवड होणे गरजेचे आहे. त्यामाध्यमातून चांगल्या प्रकारचे दर्जेदार संशोधन झाले तर निश्चितच त्याचा फायदा देशाच्या विकासासाठी होईल. नवीन तंत्रज्ञान आत्मसात केल तर निश्चितच शिक्षण क्षेत्रालाही उभारी मिळेल व दर्जेदार शिक्षण देण्यास मदत होईल.
डाॅ युवराज शंकर मोटे
भूगोल व पर्यावरण विभाग,
बाबा नाईक महाविद्यालय, कोकरूड
मो. 9923497593