भात व नाचणी विक्रीसाठी शेतकरी नोंदणीस 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
schedule05 Dec 23 person by visibility 158 category
कोल्हापूर : आधारभूत किंमत खरेदी योजना 2023-24 अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावर धान (भात) व रागी (नाचणी) विक्रीसाठी शेतक-यांना नोंदणी करण्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतक-यांनी पिकविलेले धान (भात) व नाचणी (रागी) हमीभावाने विक्री करायचा आहे. त्या शेतकऱ्यांनी मुदतीत खरेदी केंद्रावर समक्ष जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी केले.
फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत शेतकरी नोंदणी सुरु आहे. चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित तुर्केवाडी, चंदगड तालुका कृषीमाल फलोत्पादन सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित दाटे, आजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ मर्यादित. राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघ मर्यादित सरवडे व राधानगरी तालुका ज्योतिर्लिंग सहकारी भाजीपाला खरेदी विक्री संघ मर्यादित राशिवडे. कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्योग खरेदी विक्री संस्था मर्यादित कोल्हापूर, भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघ मर्यादित गारगोटी व भुदरगड तालुका सहकारी कृषी औद्योगिक भाजीपाला व फळे खरेदी विक्री संघ मर्यादित गारगोटी. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर येथे नोंदणी सुरु आहे.
शासनाने FAQ प्रतीच्या धान (भात) साठी 2 हजार 183 रुपये व रागी (नाचणी) साठी 3 हजार 846 रुपये प्रति क्विंटल हा हमीभाव जाहीर केला आहे. नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी हमीभावाने धान व नाचणी विक्री करीता याठिकाणी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी केले.
अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, गडहिंग्लज व जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर येथे संपर्क साधावा.