सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ? : संभाजीराजे छत्रपती
schedule04 May 24 person by visibility 177 categoryराजकीय
करवीरचे लीड सर्वाधिक असणार : आम.पी.एन. पाटील
बीडशेड येथे प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा
कोल्हापूर :
भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ आहे. जीएसटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची लूट सुरु आहे. खतांचे दर तिपटीने वाढले आहेत. न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दाबला जातो. कृषीप्रधान देशाचा कृषिमंत्री कोण हेच कोणाला माहीत नसेल तर मग शेतकऱ्यांचा प्रश्न कसे सुटणार? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला. मतदानातून शेतकरी निश्चितपणे हा राग व्यक्त करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ बीडशेड (ता. करवीर) येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आमदार पी.एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित सडोली खालसा व सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक विश्वास पाटील हे होते.
संभाजीराजे पुढे म्हणाले, शाहू छत्रपती व आमदार पी.एन.पाटील यांची मैत्री आहे. स्वतः पी एन पाटील व त्यांचे संपूर्ण कुटुंब प्रचारासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत.त्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही त्याच ताकदीने सक्रिय आहेत.
आमदार पी.एन.पाटील म्हणाले, शाहू छत्रपती महाराजांना जिल्ह्यात मोठा पाठिंबा मिळत आहे. गावागावांत जास्तीतजास्त मते कशी मिळविता येईल, बाहेरची मते कशी आणता येतील यासाठीच सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. छत्रपतींच्या विजयात करवीर लीड सर्वांधिक असणार आहे. पंतप्रधान, केंद्रातील मंत्री, मुख्यमंत्री कोल्हापुरात भीतीपोटी तळ ठोकत आहेत, याचा अर्थ विरोधी उमेदवाराचा पराभव निश्चित आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.
गोकुळचे संचालक विश्वास पाटील म्हणाले, शाहू छत्रपतींचे वातावरण सगळीकडेचं चांगले आहे, ते शेवटपर्यंत टिकवून ठेवूया.अनेक जण म्हणतात की, विमानतळासाठी आम्ही निधी आणला, हे केले, ते केले म्हणून; पण ही सगळी जागा छत्रपतींनी दिली हे ते विसरले असल्याची टीका केली.
यावेळी भोगावतीचे कारखान्याचे संचालक केरबा पाटील यांचे भाषण झाले. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी प्रास्ताविक केले. भोगावती कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील, मार्केट कमिटीचे सभापती भारत पाटील भुयेकर, गोकुळचे माजी संचालक सत्यजित पाटील, सुभाष सातपुते, मारुतीराव जाधव, सुनील खराडे, विजय भोसले, माजी सभापती पांडुरंग पाटील, चेतन पाटील यांचेसह भोगावती कारखान्याचे संचालक, ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी मानले.