Awaj India
Register
Breaking : bolt
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दादा यांच्या अखेरच्या दर्शनासाठी लोकांची मोठी गर्दीशिक्षण क्षेत्रात संस्था उभारणीचं मोठं काम करणाऱ्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली : राज ठाकरे कुलगुरू यांनी घेतले शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनमाजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचा* *‘बेस्ट इन्स्टिट्यूट’ पुरस्काराने सन्मान*गोकुळ निवडणुकीसाठी कोल्हापूर खंडपीठाने वाढीव कालावधी द्यावा – माणिक पाटील (चुयेकर)कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण कामाला गतीगोकुळ दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करण्याचे आदेश!*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या* *६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड*दादासाहेब गवई यांच्या ११ व्या स्मृतीदिनानिमित्त कोल्हापुरात अभिवादन

जाहिरात

 

शिक्षण क्षेत्रात संस्था उभारणीचं मोठं काम करणाऱ्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली : राज ठाकरे

schedule05 Aug 26 person by visibility 6 categoryराजकीय

 

मुंबई – काल काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचं निधन झालं. शिक्षण क्षेत्रात संस्था उभारणीचं मोठं काम करणाऱ्या या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली,वाहिल्याची भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करून व्यक्त केली आहे. 

राज ठाकरे यांनी म्हटले आहे कि, डी. वाय. पाटील ज्या काळात राजकारण आणि समाजकारणात आले, तो काळ वेगळा होता. तो केवळ सत्तेचा नव्हता, तर संस्थात्मक उभारणीचा होता. ग्रामीण महाराष्ट्रात सहकारी संस्थांचं जाळं वेगाने विस्तारत होतं आणि त्यातून राज्यातील मोठ्या भागात आर्थिक परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली होती.
मात्र त्याच काळात देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उच्च शिक्षणाच्या संस्था, विशेषतः अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या अपुरी होती. आज पुणे, मुंबईसारख्या शहरांतील अनेक नामांकित महाविद्यालयांचा इतिहास ब्रिटिशकालापर्यंत पोहोचतो. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयआयटींसारख्या संस्थांची स्थापना करून उच्च शिक्षणाचा भक्कम पाया घातला; पण इतक्या विशाल देशात व्यावसायिक शिक्षणाची मागणी प्रचंड वेगाने वाढत होती. ती गरज केवळ सरकारच्या बळावर पूर्ण होणं शक्य नव्हतं आणि त्याही पेक्षा शिक्षणावरचा सरकारचा खर्च हा प्रत्येक दशकांत कमीच होत चालला आहे. त्यामुळे शिक्षणाचं खाजगीकरण हे अपरिहार्य होतं. 
अशा वेळी डी. वाय. पाटील यांनी शिक्षणातील संस्थात्मक उभारणीचं मोठं काम हाती घेतलं. आदर्श परिस्थितीत प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण सरकारमार्फत उपलब्ध व्हायला हवं, यात दुमत असण्याचं कारण नाही. पण वास्तव हे आहे की भारतात शिक्षणावरील सार्वजनिक खर्च दीर्घकाळ अपेक्षेपेक्षा कमीच राहिला. अशा परिस्थितीत खाजगी क्षेत्राने शिक्षणात पुढाकार घेऊन संस्था उभारण्याची गरज निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर डी. वाय. पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेब विखे पाटील आणि दत्ता मेघे यांच्यासारख्या नेत्यांनी शिक्षण क्षेत्रात उभारलेल्या संस्थांचं महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवतं.
गेल्या तीन-चार दशकांत डॉक्टर, अभियंते, संशोधक, उद्योजक आणि विविध क्षेत्रात काम करणारे लाखो विद्यार्थी या संस्थांतून घडले. हे योगदान मोठं आहे. 
एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाहीत; त्याभोवती वसतिगृहं, रुग्णालयं, लहान उद्योग, वाहतूक व्यवस्था आणि रोजगाराचं संपूर्ण अर्थकारण उभं राहतं. एका संस्थेमुळे संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलू शकतो, हे जुन्या पिढीतील अनेक नेत्यांच्या मनात पक्कं रुजलेलं होतं.
शिक्षण क्षेत्रात उभारलेल्या संस्था असोत किंवा नवी मुंबईतील स्टेडियम दोन्हीकडे त्यांच्या विचारातील भव्यता आणि दीर्घकालीन दृष्टी स्पष्टपणे दिसून येते.
राजकारणातून संस्था उभारून समाजावर दीर्घकालीन ठसा उमटवणाऱ्या पिढीतील ते अखेरच्या महत्त्वाच्या प्रतिनिधींपैकी एक होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes