शेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी शाहू महाराजच खासदार आवश्यक : आ. पी. एन. पाटील
schedule04 May 24 person by visibility 194 categoryराजकीय
कोल्हापूर : केंद्र सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे, अशावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी शाहू महाराज खासदार होणे आवश्यक आहे, त्यामुळे महाराजांच्यारूपाने शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीत पाठवा असे आवाहन आमदार पी.एन. पाटील यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ यवलुज-पडळ येथे झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. शेतकरी बांधवांसाठी मी सदैव उपलब्ध असून कोणतीही कामासाठी फोनवर आणि प्रत्यक्ष कोणीही कधीही थेट संपर्क करू शकता अशी ग्वाही शाहू महाराज यांनी या सभेत दिली.
करवीर विधानसभा मतदारसंघातील पन्हाळा तालुक्यातील यवलुज, पडळ, सातार्डे, भोगाव, काटेभोगाव या पंचक्रोशीतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या झालेल्या मेळाव्यात गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके, बाळासाहेब खाडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील, बाजार समिती सभापती भारत पाटील भुयेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष स्थानी जयसिंग हिर्डेकर होते.
यावेळी बोलताना आ. पी. एन. पाटील म्हणाले, कोल्हापूरला पंतप्रधान मोदी येऊन गेले. अमित शहा आलेत. मुख्यमंत्री शिंदे तीनदा येऊन गेले आणि पुन्हा येत आहेत. त्यांनी आता इथेच थांबून चार जूनला निकाल बघूनच जावे. कोल्हापुरातील वातावरण बघून त्यांना पराभवाची भीती वाटत आहे. म्हणूनच त्यांची चलबीचल झाली आहे. या शाहू महाराजांनी काय केले असे विचारत आहेत. यांनी काय केले ते येथील शेतकऱ्यांना गावकऱ्यांना माहित आहे. सर्वसामान्याबद्दल त्यांना कळवळा आहे. मंडलिक मुश्रीफ वादात येथील कर्जमाफीचे शेतकऱ्यांचे 112 कोटी परत गेले. तेच आता एक झाले आहेत. मोदींनी काँग्रेसच्या काळातील 26 कंपन्या विकल्या आणि गेल्या दहा वर्षात एकही कंपनी काढली नाही.
शाहू महाराज म्हणाले, छत्रपती शिवरायांनी पन्हाळा घेतल्यानंतर या ठिकाणी राजधानी केली. महाराणी ताराबाईंनी पन्हाळा लढाई करून परत मिळवला आणि रा. शाहू महाराजांनी देखील अनेक वर्षे करवीरचा कारभार पन्हाळ्यावरूनच केला आणि अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अशा हा पन्हाळा परिसर शेतीशी निगडित आहे. नव्या राजकीय पर्वाची वाटचाल करताना शेतकरी हाच केंद्रबिंदू म्हणून काम करणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, रा. शाहू महाराजांनी बांधलेले राधानगरी धरण, त्यानंतर काँग्रेसच्या काळात झालेली धरणे वगळता गेल्या दहा वर्षात काहीही विकासाची ठोस कामे झालेली नाहीत. भाजपचा फसवा विकास बाजूला फेकून देऊन आपल्याला शाश्वत विकास करायचा आहे. काहीजण मी सहज कोणाला भेटणार नाही असा अपप्रचार करीत आहेत. पण मला थेट भेटण्यास, संपर्क करण्यास कसलीही अडचण येणार नाही. संपर्क कार्यालयाच्या माध्यमातूनही सर्वांची कामे होतील अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी चेतन नरके म्हणाले की छत्रपती आणि नरके कुटुंबीयांचा असलेला जुना स्नेह आजही टिकून आहे. त्यांच्याशी माझी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाबीवर नेहमी चर्चा होत असते. आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावचे प्रश्न वेगळे आहेत ते शाहू महाराजांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आपण एकजुटीने त्यांना निवडून आणू या.
यावेळी बाळासाहेब खाडे, बाजीराव पाटील, दगडू भास्कर, दिनकर कांबळे, पडळच्या माजी सरपंच जयश्री राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बी. एच. पाटील, अमर पाटील शिंगणापूरकर, शंकरराव पाटील, पैलवान अशोक माने, शाहू काटकर, शशिकांत आडनाइक, विलास पाटील आदी उपस्थित होते.