तुझ्याशिवाय पर्याय शोधावा असं मनात येतंं तोपर्यंत...
schedule14 Jul 24 person by visibility 229 categoryलाइफस्टाइल
तुझ्याशिवाय पर्याय शोधावा असं मनात येतंं तोपर्यंत... प्रशांत चुयेकर
मस्त रे छान वाटतं तुला मिठी मारताना. छान वाटतं तुझ्या सहवासात असताना. येणार नाहीस या भीतीने मनात अनेक अनेक शंका निर्माण होतात. राग सुद्धा येतो. तुझ्याशिवाय काहीतरी पर्याय शोधावा असं मनात येतं. तुला सोडून द्यायचा विचार पक्का केलेला असतो त्यावेळी मात्र अचानक तू मारलेली मिठ्ठी मला राग विसरायला प्रवृत करते.
पाऊस होय मी पावसावरच लिहतोय. पाऊस सर्वांनाच हवा हवा असतो. कधी ? आपण घरी पोहोचल्यावर. ऑफिसमध्ये पोचल्यावर. आमच्या कामा व्यक्तिरिक्त बरसल्यावर. बाकी जाता येता अंगावर जर पाऊस पडलाच तर शिव्या द्यायला सुद्धा तुला अनेकजण घाबरत नाही.
माझं मात्र वेगळं आहे तू येशील त्यावेळी मी कुठेही थांबत नाही सरळ तुझ्याशी बोलत, तुला झेलत मी प्रवास करतो. खरंतर पावसापासून संरक्षण करणारा रेनकोट मला नकोच असतो. मी ज्या ठिकणी जातो त्या ठिकाणी मी भिजलेल्या पावसात, अनेकांना बघायला नको वाटतं म्हणून मी वापरतो. काम आटपले की शेवटची फेरी घराकडे जाणारी असली की मी मात्र रेनकोट बाजूला ठेवून अलगद तुला झेलत प्रवास करतो. 'प्यार की झप्पी' असाच अनुभव तू देऊन जातोस.
कृत्रिम पाऊस कृत्रिम प्रेम
प्रेमी मुलांना या अर्थाने सुद्धा पाऊस आवडायला लागतो. त्यांचा आनंद वेगळाच असतो. पावसात भिजताना कोणालातरी शेअर करताना सुद्धा खूप आनंद होतो असं ऐकलं होतं. मी सुद्धा म्हटलं चला पावसाला सुरुवात झाली तर आपण शेअर करू. मस्त पावसाची मजा घेऊ. मात्र सहकारी पावसाला घाबरून पळून गेला याचं मला दुःखही वाटलं. म्हटलं वाळवंटाचं मन असणाऱ्या माणसांना पाऊस कसा आवडणार. हिरवळ त्यांना नकोच असते.
चित्रपटातील कृत्रिम पाऊस बघून अनेकांना वाटतं पावसात भिजावं. प्रत्यक्षात पाऊस लागला की मात्र पाऊस गेल्यानंतर निघून जावं असं अनेकांना वाटतं. पावसापासून तयार झालेला चिखल,पाण्याने भरलेली खड्डे, बेडकांचा डराव, डराव आवाज नको वाटतो. आम्हाला मात्र या बेडकांचा डराव डराव आवाज सुद्धा एखाद्या संगीतकाराच्या म्युझिकपेक्षा जास्त आवडतो. कृत्रिम पाऊस आणि कृत्रिम पावसाचा आवाज ऐकणाऱ्यांना मात्र कृत्रिम प्रेमच मिळतं.
पावसावर प्रेम करणारी खरी मुले
लहान मुलांना तुझं कौतुक वाटतं उत्सुकता वाटते आणि तू बरसलास की त्यांना तुझ्याबरोबर ओलं चिंब भिजवून जावं असं वाटतं. नवीन काहीतरी निसर्गाचा आनंद त्यांना घ्यायला मिळतो म्हणून ते खूप खुश असतात. शाळा सुरू असताना अनेकवेळा त्यांचं बाहेर बघणं असतं किती मस्त पाऊस लागत आहे असे म्हणत ते कुरकुरत असतात की आपण पावसात का भिजत नाही; मात्र शाळेच्या शिक्षकापासून ते घरच्या मोठ्या लोकांच्या पर्यंत सर्वांनी सांगितलेला असतं की पावसात भिजू नको आजारी पडशील.
ऋतूत विलीन होणारे शेतकरी आणि मंडळी
खरंतर पावसात भिजल्यावर आजारी पडायचा प्रश्नच येत नाही प्रत्येक ऋतूचं त्याच पद्धतीने स्वागत करायला हवं. ऋतूपासून आम्ही पळतो मग उन्हात टोपी घालतो टोपी नाही घातले की आमचं डोकं दुखतंय. थंडीत स्वेटर घालतो स्वेटर नाही घातले की मग आम्हाला थंडी वाजून ताप येतो. पावसात सुद्धा रेनकोट नाही घातलं की ताप येतो डोके दुखत. ह्या सगळ्या ऋतूत आपण संरक्षणाला काहीच नाही घातलं तर मात्र आपल्याला कोणतंच कारण सांगावे लागणार नाही आजारीही पडणार नाही.
शेतात काम करणारा शेतकरी आणि त्यांच्या मंडळी थंडीत स्वेटर घातलेल्या दिसत नाहीत_ उन्हात टोपी सुद्धा घालत नाहीत. पावसात आहे त्या कपड्यावर डोक्यावर वैरणीचा भिंडा घेऊन घरी भिजत येत असतात. ते आजारी पडतच नाही. प्रत्येक ऋतूला त्यांनी स्वीकारलेलं असतं त्यांच्यामुळे ऋतूचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही.
पावसाचा अंदाज सांगणारे वृद्ध मंडळी
वयस्कर माणसं छान पावसाचा अनुभव घेत असतात. कितीही पडला तर कोणता ऋतू आहे, हा कधी बंद होणार आहे त्याचा अंदाज लावत असतात. कोणत्या साली महापूर आला होता कोणत्या साली काय काय झालं होतं याचं मात्र ते अंदाज सांगत असतात.अनुभवाचे पावसाळी किती काढले याचा सुद्धा ते परफेक्ट सांगत असतात.
महापूर आला तरी चालेल पण पाऊस पाहिजे
महापूर ज्या ठिकाणी आला त्याच ठिकाणी लोकांना कदाचित पाऊस आवडत नसेलही. मला असं वाटतंय पाऊस न पडल्यापेक्षा महापूर परवडला मात्र पावसाने आलंच पाहिजे मग काही ठिकाणी महापूर आला तरी बैहत्तर.
महापूर येण्याला पाऊस कमी जास्त पडणं हे कारण नसून महापूर येण्याला कारणीभूत आपण आहोत.नदी नाल्यात अतिक्रमण केले तर पाणी शहरात, गावात शिरणार नाही तर कुठे जाणार. त्याला जबाबदार आपणच आहोत त्यामुळे पावसाला नावं ठेवण्यात काय अर्थ नाही. पावसाचे प्रेमाने स्वागत केलेच पाहिजे पाऊस आहे तर सर्व आहे.
कार्यालयातून बाहेर सुटल्या सुटल्या पाऊस आला असेल तर काहींना पाऊस खोटा वाटतो. पाऊस पडला तर खायला अन्न मिळणार आहे. खऱ्या अर्थाने आम्हाला उपयोगी असणारा पाऊस याला सुद्धा आपण खोटं म्हणतो याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही.
प्रशांत चुयेकर
9765024443, 8788213076