होय, मी भांडी घासतोय!
schedule06 Jan 25 person by visibility 221 categoryसामाजिक
होय, मी भांडी घासतोय!' सांगायला मला कधीच लाज वाटत नाही. मी बायकोला मदत करतो. मला घरातील धुणीही धुवायची आहेत. शक्य तितके जास्त दिवस बायकोला जेवण, नाश्ता सुद्धा करून द्यायचा आहे. महिलांना समान हक्क मिळाले पाहिजे अशी भावना नुसती व्यक्त करून चालणार नाही तर त्यासाठी स्वतः प्रयत्न काय करतो हे सुद्धा बघणं गरजेचं आहे.
स्वतः शिक्षित असलेले, शहाणी समजणारे, उद्योगपती असणारे अनेक जण आहेत. पैशाची कमतरता नसताना सुद्धा लग्नात हुंडा घेतलेल्यांची संख्या सुद्धा बहुतांशी आहे. लग्नानंतर पहिली डिलिव्हरी सासरवाडीत झाली पाहिजे. त्याचा खर्च सुद्धा सासरवाडीनेच केला पाहिजे असं म्हणणारे हेच शहाणे उद्योगपती शिक्षित आहेत. महिलांना समान हक्क पाहिजे असे म्हणणारे सुद्धा हेच आहेत. मी मात्र स्वतःला यांच्यापेक्षा वेगळा समजतो कारण मला असे कधीच वाटलं नाही. मी लग्नात हुंडा घेतलेला नाही. बाळंतपणासाठी सासुरवाडीवर भार सुद्धा दिला नाही.
बायका बाहेर गेले की बिघडतात त्यांच्यावर कंट्रोल करणे अवघड होतं अशी मानसिकता असणाऱ्यांच्यापेक्षा मी थोडा वेगळाच. बारावी झालेली पत्नी माझ्याजवळ आल्यानंतर बीकॉम झाली, टॅली झाली, नोकरी सुद्धा केली. पुरुष जर बाहेर जाऊन बिघडत असेल तर महिला बाहेर गेल्या आणि बिघडलं तर दुःख बाळगायला काय झालं. जसे आपण चांगले आहे बाहेर पडून सुद्धा. पुरुष असं सांगतो त्यावेळी महिला सुद्धा चांगली असणारच असा विश्वास आपण का ठेवत नाही. आपण चांगला असेल नोकरी करत असताना तर नोकरी करणारी महिला सुद्धा चांगली असेल असा विश्वास जोपर्यंत बळकट होत नाही तोपर्यंत महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकत नाहीत.
नोकरी करणारी महिला सुद्धा म्हणते की नवऱ्याला विचारून मी काय ते पैशाचं सांगते. माहेर, सासरवाडीत सुद्धा स्त्री कमावून गुलामीत असेल तर तिला स्वतंत्र कधी मिळणार असा प्रश्न मला सतावतोय. मग मी स्वतः तिच्यासाठी काय करतो असं वाटतं त्यावेळी मला असं वाटतं की सुरुवात माझ्यापासूनच करावी.
नोकरी लागल्यानंतर तिने तिचा पैसा काय केला याची मी कधीही विचारणा करत नाही. तिच्या गळ्यात किती सोनं आहे याचाही मला कधी हिशोब नाही. तिने कोणाला उसने पैसे दिले, मला माहित नसते. तिने मैत्रिणीला मदत केली तरी सुद्धा मला ती विचारात नाही किंवा मला नाही सांगितलं तर त्या गोष्टीचा मला कधीच राग आला नाही. कारण ती स्वातंत्र्यात जगते याचा मला खूप अभिमान आहे.
तशी इतर पुरुषासारखी माझी ही मानसिकता होतीच म्हणा. लग्न झाल्यानंतर बऱ्याच वेळी माझे आणि तिच्यामध्ये भांडण व्हायचेच. मी पुरुषी मानसिकता जगलेला माणूस. मी सुद्धा तिला मारहाण केलीच. एखदा तिच्या डोक्याला इजा झाल्याने डोक्यातूनच रक्त आलं. मी स्वतःलाच प्रश्न विचारला की मी काय करत आहे. पत्नी समजावून घेत नसेल तर मी तरी समजणारा आहे. मी माघार घेतली तर काय बिघडणार आहे, असं म्हणत मी तिला कधीही हात न लावण्याचा विचार केला. तेव्हापासून आजतागायत मी कधीही तिने काही बोलली तरी मी साधं उलट सुद्धा बोलत नाही. कधी कधी तीच म्हणते की मी इतक्या शिव्या दिल्या तरी कसं काय वाईट वाटत नाही मग मी शांतपणे म्हणतो स्त्रियांचा हा सुद्धा वर्चस्वाद सिद्ध झाला पाहिजे. चांगल्यासाठी.
स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभा राहिले पाहिजे या मताचा मी. आज घराचे बांधकाम करत असताना मला खूप अडचणी निर्माण झाल्या सिविल खराब असल्याकारणाने कुठलीही बँक कर्ज देत नव्हती. बायकोने दोन वर्षे नोकरी केली आणि तिच्या महिला मैत्रिणी झाल्या. त्यांच्याकडून तिने पै आणि पै गोळा केला. वीस वर्षे ज्यांच्या सहवासात मी काढली अशा माणसांनी मला फुटकी कवडी सुद्धा दिली नाही. बायको म्हणाली, 'इनामदारीच्या गप्पा मारताय संकटकाळी तुमच्या मदतीला कोणी येत नसेल तर ती मैत्री काय कामाची. कधीही रात्री अपरात्री हाक मारली तर उठून जाता आज मात्र तुमच्यासाठी कोणच जागे नाही हे कसं काय",
मी म्हटलं, "स्वार्थासाठी मैत्री केलीच नव्हती गरज लागली म्हणून मागितले, नसतील त्यांच्याजवळ असतील त्यावेळी देतील.
बायकोचा मात्र मला खूप अभिमान वाटला. गळ्यातल्या सोन्यापासून जे तिच्या घरच्या माणसांच्या पर्यंत तीने संकटावर मात केली. यावर मला तिचा खूप अभिमान वाटला. पुरुषी मानसिकतेच्या भावनेने केलेला अत्याचार मला आठवला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं की आपण तिच्यावर खूप अन्याय केलेला आहे.
स्त्री समानतेची गोष्टी आपण करत असेल तर त्यांच्यासाठी काय करतो असं मला वाटायला लागलं त्यावेळी घरातली भांडी घासण्यापासून ते नाष्टा करण्यापर्यंतचा भार आता मी उचलणार. मला वेळ असेल त्या त्यावेळी मीच सगळं करणार असा निर्धार केला. त्या गोष्टीला मी सुरुवात सुद्धा केली.
आमच्या घरात कधीही भांड्याचा ढिगारा दिसत नाही कारण ती भांडी मी घासतो. आता तिला मी सांगितले भाकरी सुद्धा मला करायला शिकव. तू उठल्याउठल्या नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत मी करेन आणि काम सुद्धा करेन जर तू सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या असतील तर माझंही कर्तव्य आहे की त्याच जबाबदाऱ्या मी सुद्धा पार पाडाव्यात. मी आता भाकरी सुद्धा शिकतोय. अनेकांना हा रांडोळापणा वाटत असला तरी समानतेच्या गप्पा मारत असताना एक पाऊल तिच्यासाठी मलाही करताना कोणतीही लाज वाटत नाही.
आज अश्विनी या माझ्या पत्नीचा गुणगौरव करण्याचे कारण एवढेच की आज (7 जानेवारी)त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने स्त्रिया पुरुषांना समानतेच्या गप्पावर हा एक पर्याय करता येईल का यासाठी विचारतील व मित्र सुद्धा गंभीरपणे विचार करतील असा आशावाद व्यक्त करतो आणि माझ्या बायकोला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.
प्रशांत चुयेकर