कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यतेतील अन्यायकारक निकष बदलण्याची मागणी
schedule31 Aug 26 person by visibility 16 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यतेसंदर्भात शिक्षण संचालनालयाने शासनाकडे सादर केलेल्या मसुद्यातील अन्यायकारक निकषांमध्ये सुधारणा करावी, अशी मागणी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी शिक्षण उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यतेसाठी प्रस्तावित निकष अत्यंत कठोर असून त्याची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील किमान ६ हजार ते १० हजार शिक्षक कमी होऊन अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
निवेदनातील प्रमुख मुद्द्यांनुसार, वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांसाठी लागू करण्यात येणाऱ्या संचमान्यतेच्या निकषांमुळे ४५ मिनिटांची तासिका ४० मिनिटांची केल्यास हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.
तसेच विज्ञान शाखेसाठी असलेल्या २० विद्यार्थ्यांची बॅच ३० विद्यार्थ्यांची केल्यास हजारो शिक्षक तसेच सर्व अर्धवेळ शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखेसाठी १२० विद्यार्थीसंख्या निश्चित केल्यामुळे अनेक तुकड्या अनुदानासाठी अपात्र ठरण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम शिक्षकांच्या नोकरीच्या अस्तित्वावर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय उच्च माध्यमिक स्तरावरील प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला बराच कालावधी लागत असल्याने विद्यार्थी कोचिंग क्लासेसकडे वळतात आणि विद्यार्थीसंख्या कमी झाल्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यतेसंदर्भातील प्रस्तावित अन्यायकारक मसुद्याची अंमलबजावणी करू नये, प्रचलित निकषांनुसारच संचमान्यता द्यावी आणि शिक्षण उपसंचालक स्तरावर ऑनलाइन संचमान्यता न करता योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी कौस्तुभ गावडे यांनी केली आहे.