गोकुळच्या अध्यक्ष निवडीत लोकशाहीचा गळा घोटू नका; आमदार सतेज पाटील यांचे आवाहन
schedule03 Nov 26 person by visibility 16 category
दूध उत्पादकांच्या कौलाचा आदर करा; कायदा बदलून बहुमत फिरवण्याचे प्रयत्न थांबवा – सतेज पाटील
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून निर्माण झालेल्या राजकीय आणि कायदेशीर संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांनी पत्र लिहून लोकशाहीच्या रक्षणासाठी आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.
गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत दिले असताना अध्यक्ष निवड सभेत महायुतीचे सर्व १२ संचालक गैरहजर राहिल्याने सभा गणपूर्तीअभावी तहकूब झाल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.
आमदार पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागांवर समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत दिले. मात्र, २९ ऑक्टोबरच्या अध्यक्ष निवड सभेत महायुतीचे सर्व १२ संचालक गैरहजर राहिले. त्यामुळे गणपूर्तीच्या तांत्रिक कारणावरून सभा तहकूब झाली. पराभव मान्य करण्याऐवजी प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
पत्रात पुढे त्यांनी लोकशाही व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. केवळ बहुमत मिळवून उपयोग नसेल आणि तांत्रिक कारणांचा आधार घेऊन जनतेचा कौल रोखला जाणार असेल, तर मतदानाचा अर्थ काय राहतो, असा सवाल त्यांनी केला आहे. गोकुळमधील बहुमतासाठी कायदा बदलण्याची किंवा शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन संख्याबळ फिरवण्याची चर्चा होत असेल, तर हा प्रकार केवळ गोकुळपुरता मर्यादित राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही स्वीकृत सदस्यांच्या माध्यमातून लोकशाहीचा कौल बदलण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे जनतेने दिलेल्या मताला आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या बहुमताला काहीच अर्थ उरणार नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केल
प्रशासकीय काळात गोकुळमध्ये तोटा वाढत असताना, दुष्काळ आणि चाऱ्याच्या प्रश्नांसारख्या गंभीर समस्यांवर निर्णय घेणारे लोकनियुक्त मंडळ अस्तित्वात नसणे हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विरोधी संचालकांनाही त्यांनी नम्र आवाहन केले असून, शेतकऱ्यांचा कौल स्वीकारून पुढील सभेला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज बना!
गोकुळच्या माध्यमातून सहकाराच्या पायावरच घाला घातला जात असल्याची खंत व्यक्त करत आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील संपादक आणि पत्रकारांना या विषयावर ठाम भूमिका मांडण्याचे आवाहन केले आहे. सहकाराचा वारसा जपण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी माध्यमांनी जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.
दरम्यान, अध्यक्ष निवडीचा वाद न्यायालयात
गोकुळ अध्यक्ष निवडीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये पोहोचला आहे. २ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अध्यक्ष निवडीची सभा घेण्याचे निर्देश दिले असून, सर्व २५ संचालकांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या सभेत काय घडणार आणि गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटणार का, याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.