बुद्ध जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान व बौद्ध वधू-वर मेळावा; डिंगे फाउंडेशनचा उपक्रम
schedule04 May 26 person by visibility 11 categoryसामाजिक
कोल्हापूर (प्रतिनिधी) :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दिलेल्या बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रसार व मानवकल्याणाचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र, धर्मप्रसाराच्या कार्याला अपेक्षित गती मिळत नसल्याची खंत व्यक्त करत, या विचारांना चालना देण्यासाठी कोल्हापूर येथील माजी खासदार एस. के. डिंगे मेमोरियल फाउंडेशनतर्फे एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त रविवार, दि. १७ मे २०२६ रोजी महिलांचा सन्मान सोहळा तसेच बौद्ध वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आंबेडकरी समाजासह बहुजन समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतिशील महिलांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच सहभागी होणाऱ्या महिलांचाही यथोचित गौरव केला जाणार आहे.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पूर्णांगिनी तथा विधवा महिलांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्यांच्या पुनर्वसन व सामाजिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा प्रयत्न महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर बौद्ध समाजातील युवक-युवतींसाठी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करून विवाह जुळवणीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी आपली नावे दि. १० मे २०२६ पर्यंत डिंगे बिल्डिंग, 1298 सी, रिलायन्स मॉलजवळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर येथे सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदवावीत, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष समाजभूषण सदानंद शंकरराव डिंगे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9370283151 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.
समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.