कौटुंबिक वादाचे कारण ; पतीला अटक
उचगाव : प्रतिनिधी
कौटुंबिक वादातून पतीने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याने पती जयंत संजय वाठारकर (२५, रा. मूळ कणेरीवाडी, सध्या रा. उचगाव) याच्यावर पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. शहरालगत असलेल्या उचगाव (ता. करवीर) येथील मणेरमळाच्या महालक्ष्मीनगर येथे रविवारी पहाटे ही घटना घडली. पतीकडून पत्नी पल्लवी जयंत वाठारकर (वय २३) हीचा खून झाल्याची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयंत व पल्लवी यांचा अडीच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. या विवाहास जयंतच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे ते दोन वर्षांपासून मणेरमळामध्ये महालक्ष्मीनगर येथे भाड्याने राहत होते. जयंत हा पाण्याचा टँकर भाड्याने देण्याचा व्यवसाय करतो. पल्लवीचे माहेरही मणेरमळा येथील हुंकार कॉलनीत आहे. त्यांना दीड वर्षाची एक मुलगी आहे. तो आई-वडिलांच्या घरी जात असल्याने या दोघांमध्ये वारंवार वाद होत होता. शनिवारी रात्री या दोघांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यावेळी जयंत याने पल्लवीला मारहाण केली. यामध्ये जयंतच्या हातातली कडे पल्लवीच्या मानेवर लागले. त्यामध्ये रक्तस्त्राव झाला. तिला प्रथम राजारामपुरी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून तिला सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
याबाबतची फिर्याद पल्लवीची आई नंदा सुरेश पवार (रा. हुंकार कॉलनी, मणेर मळा, उचगाव) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान घटनास्थळी करवीरचे पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भेट दिली. याबाबत अधिक तपास गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर करत आहेत.