कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी (KMRDA) १ जून रोजी दसरा चौकात लाक्षणिक उपोषण
schedule24 May 26 person by visibility 7 categoryराजकीय
श्री. राजू उर्फ सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या 'मेट्रो सिटी' विकासासाठी जनआंदोलन
कोल्हापूर : आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याचा सुनियोजित विकास, ग्रामीण आणि शहरी भागाची एकात्मिक प्रगती आणि कोल्हापूरला 'टीयर १' (अ वर्ग) जिल्ह्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी 'कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण' (KMRDA) स्थापन करावे, या मुख्य मागणीसाठी येत्या सोमवार, दिनांक १ जून २०२६ रोजी दसरा चौक येथे भव्य लाक्षणिक उपोषण आणि जनजागृती चळवळीचे आयोजन करण्यात आले आहे. 'एस फोर ए ग्रुप'चे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. राजू उर्फ सुनील श्रीपती माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, सायंकाळी ७:०० वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासमोर ज्योत प्रज्वलित करून या चळवळीची सुरुवात केली जाणार आहे.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात राजू माने यांनी कोल्हापूरच्या विकासाचा संपूर्ण आराखडा आणि प्राधिकरणाची गरज स्पष्ट केली आहे. सन २०१२ पासून कोल्हापूरच्या हद्दवाढ प्रश्नावर अभ्यास समितीच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील तांत्रिक अडचणी समजून घेत त्यांनी सातत्याने यावर काम केले आहे. शहरीकरणामुळे ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल, तर 'महानगर प्रदेश विकास प्राधिकरण' (D-Notification द्वारे) हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
२०२६ पर्यंत कोल्हापूरची लोकसंख्या ५० लाखांवर जाणार
२०११ च्या जनगणनेनुसार कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ३८ लाख होती. २०२६ पर्यंत यामध्ये १०% वाढ धरल्यास ती ५० लाखांच्या घरात जाईल. ७४ व्या घटनादुरुस्तीनुसार २० किलोमीटर क्षेत्र आणि १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या संलग्न क्षेत्रासाठी 'महानगर प्रदेश' संकल्पना लागू होते. यामुळे कोल्हापूरचा समावेश 'टीयर १' मध्ये होऊन जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो. मुंबई (MMRDA) आणि पुणे (PMRDA) च्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास झाल्यास केंद्र व राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊ शकतो, असा विश्वास माने यांनी व्यक्त केला आहे.
आमदार चंद्रदीप नरके यांनी गेल्या वर्षापासून केलेल्या प्रयत्नांमुळे शासनाने १५ मे २०२६ रोजी प्राधिकरण क्षेत्रात बदल करून 'विशेष नियोजन दर्जा' संदर्भात आदेश दिला आहे. या निर्णयाचे स्वागत करत, आता आमदार नरके यांनी विधानभवनात थेट 'महानगर प्रदेश प्राधिकरणाची' (KMRDA) मागणी करावी, अशी विनंतीही माने यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाकडे प्रमुख मागण्या:
या चळवळीच्या माध्यमातून राज्य सरकारकडे खालील प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत:
- छत्रपती राजर्षी शाहू महाराज सर्वधर्मीय स्मशानभूमी: १०० एकर परिसरात उभारणी करावी.
- स्व. दिग्विजय खानविलकर पुतळा: शेंडा पार्क वैद्यकीय कॉलेज परिसरात माजी मंत्री स्व. दिग्विजय खानविलकर यांचा प्रतिकात्मक पुतळा उभारण्यात यावा.
- पुणे ते कोल्हापूर मेट्रो रेल्वे: या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाची त्वरित उभारणी व्हावी.
- शेतकरी जनजागृती अभियान: शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकू नयेत यासाठी विशेष मोहीम.
- भिकाऱ्यांसाठी मोफत निवारा केंद्र: जिल्ह्यातील बेघरांसाठी आश्रयस्थान उभारणे.
- म्हाडा व सिडको गृहप्रकल्प: सर्वसामान्यांसाठी हक्काच्या घरांची निर्मिती करणे.
आंदोलनाची पार्श्वभूमी आणि आवाहन
राजू माने यांनी यापूर्वी २०१५ च्या महानगरपालिका निवडणुकीत 'एस फोर ए विकास आघाडी'च्या माध्यमातून 'कोल्हापूर बॉण्ड्स' आणि 'मेट्रो सिटी'ची जनजागृती केली होती. तसेच या मागणीसाठी दसरा चौकात सलग ९९ तास उपोषणही केले होते. नुकत्याच झालेल्या २०२५-२०२६ च्या महापालिका निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांनी 'महासिटी' आणि आमदार सतेज पाटील यांनी 'कोल्हापूर बॉण्ड्स'ची घोषणा केली होती, ज्या भविष्यात निर्णायक ठरतील.
सोमवार, १ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ७:०० या वेळेत दसरा चौक येथे हे उपोषण व आंदोलन चालणार आहे. कोल्हापूरला देशातील पहिली 'ग्रीन मेट्रो सिटी' बनवण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी या चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजू उर्फ सुनील माने यांनी केले आहे. या विषयाच्या अधिक माहितीसाठी त्यांच्या 'Kolhapur Metro City Raju Mane S4A' या यूट्यूब चॅनेलवर माहितीपट प्रसिद्ध करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.