+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपाच वर्षे निष्क्रिय राहिलेल्या खासदाराचा करेक्ट कार्यक्रम करा adjustशाहू महाराजांच्या प्रचारार्थ एक मे रोजी शिव-शाहू निर्धार सभा adjustमहाराणी ताराराणी, राजर्षी शाहू महाराज यांना राजे राजवर्धन कदमबांडे यांनी केले अभिवादन adjust*१ मे ला 'O, Freedom..!' चे प्रकाशन* adjustसंविधानाबाबत गैरसमज पसरविणाऱ्या कॉंग्रेस प्रवृत्तीला कायमचे गाडा. " : राजेश क्षीरसागर; adjustमंडलिक, माने यांना विजयी करा ; राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन कदमबांडे adjustप्रवक्त्याचे वटमुखत्यारपत्र जाहीर सभेत चालते, संसदेत नाही; adjustशाहू विचार दर्शन पदयात्रेत समतेचा जागर adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही : नितीन बानुगडे-पाटील adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन*
schedule16 Apr 24 person by visibility 17 category
शाहूंचे शक्‍तीप्रदर्शन.....

महाजनसागराच्या साक्षीने महाविकास आघाडीच्या विजयाचा निर्धार पक्‍का

 

 

कोल्हापूर : ‘उरी होई धडधड... छत्रपतीऽऽऽ...’ या रोमारोमात स्फुल्‍लिंग चेतवणार्‍या टायटल साँगचा घुमणारा स्वर.... ढोल-ताशांच्या निनादाला कैचाळाची लयबद्ध साथ... हलगीच्या कडकडाटाची लहर... कार्यकर्त्यांचा श्री. शाहू छत्रपती यांच्या जयजयकाराचा अखंड जयघोष... महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी दिलेली भक्‍कम एकजुटीची साक्ष... आणि त्या साक्षीला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांच्या मोहोळाचे महाजनसागरात झालेले रूपांतर अशा सळसळत्या, उत्साहवर्धक वातावरणात लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांनी मंगळवारी (दि.16 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने महाविकास आघाडीने प्रचंड शक्तिप्रदर्शन करत एकजूट दाखवून दिली. रणरणत्या उन्हाची तमा न करता जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून कार्यकर्ते दाखल झाले होते. त्यामुळे दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर अक्षरश: महाजनसागर लोटला होता. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या जनतेने शाहू छत्रपतींच्या विजयाचा निर्धार पक्का केला. हात उंचावत कोल्हापूरची अस्मिता शाहू छत्रपती, शिवशाहूंचा विचार दिल्लीला पाठवू या अशा घोषणा देत या समुदायाने संपूर्ण जिल्हा महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचे ग्वाही दिली.

फुलांनी सजवलेल्या वाहनात खास तयार करण्यात आलेल्या ओपन टफमध्ये श्री शाहू छत्रपती यांच्यासह महाविकास आघाडी घटक पक्षातील प्रमुख नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार श्रीमती जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, शरद पवार गट राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा विद्या चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्‍वास नारायण पाटील, शिवसेनेचे उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, दौलत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी, राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभूळकर, माजी आमदार सुरेश साळोखे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे, माजी संचालक रामराजे कुपेकर, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, आपचे संदीप देसाई, वंचित बहुजन आघाडीचे दयानंद कांबळे यांच्यासह विविध संस्था, संघटना व पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती या रॅलीमध्ये सहभागी होत्या. यामुळे कार्यकर्ते व नागरिकांच्या उत्साहात आणखी भर पडली. मिरवणूक मार्गावर ‘कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, जनतेचा निर्धार... शाहू महाराज खासदार’ ही घोषणा दुमदुमली. इंडिया आघाडी व महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या 28 हून अधिक पक्षांच्या प्रमुखांचा, पदाधिकार्‍यांचा व कार्यकर्त्यांचा या मिरवणुकीत सहभाग होता. यातून महाविकास आघाडीच्या एकजुटीचे दर्शन घडले. या प्रचंड शक्‍तीप्रदर्शनाने कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून श्री शाहू छत्रपतींना दिल्‍लीत पाठवण्याचा नारा अधिकच बुलंद झाला.

सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दसरा चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. मात्र तत्पूर्वी सकाळी नऊ वाजल्यापासूनच हजारो कार्यकर्ते दसरा चौकात गटागटाने दाखल होत होते. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे झेंडे हाती घेऊन आणि महाराजांच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्ते वाजत गाजत पोहोचले. दहा वाजता दसरा चौक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी फुलून गेला होता. धनगरी ढोल पथक, हलगीचा कडकडाट यामुळे वातावरण जल्‍लोषी बनले. कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कागल, आजरा, गडहिंग्लज, चंदगड, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, गगनबावडा अशा प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सहभाग होता. कार्यकर्त्यांनी डोक्यावर पक्षाच्या टोप्या, गळ्यात मफलर तर कुणी फेटे परिधान केले होते. महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष, आरपीआय, भाकप, माकप, लाल बावटा, संभाजी ब्रिगेड, लोकजनशक्ती पार्टी अशा विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व शहरातील वेगवेगळ्या संस्था, तालीम संघटना, सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता. महिलांची उपस्थितीही मोठी होती. मिरवणूक मार्गावर पक्षाच्या विजयाच्या घोषणाच्या देत कार्यकर्त्यांनी तसेच महिला कार्यकर्त्यांनीही फेर धरला. फडफडणारे झेंडे, विजयाच्या घोषणा यामुळे मिरवणूक मार्गावर चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते.

रॅलीच्या अग्रभागी धनगरी ढोल व हलगी पथक होते. त्या पाठोपाठ कार्यकर्त्यांचा ताफा होता. महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुखांचे, पदाधिकार्‍यांचे प्रतिमा असलेले फलक घेऊन कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. ‘कोल्हापूरच्या विकासासाठी-शाहू महाराज... जनतेसाठी कोल्हापूरचा एकच आवाज-शाहू महाराज..... कोल्हापूरची अस्मिता, कोल्हापूरचा स्वाभिमान-शाहू महाराज.... जनतेचा निर्धार-शाहू महाराज खासदार’ या आशयाचे फलक लक्षवेधी ठरले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे ‘हिंदुत्वाची साद, उद्धवजींना साथ,’ या मजुकराचे फलकही लक्ष वेधून होते. ‘आमचं ठरलंय गद्दारांना मतदान नाही, चला गद्दारांना गाडायला, शाहू छत्रपतींचा फॉर्म भरायला’अशा मजकुराच्या फलकातून कार्यकर्त्यांनी फुटीर खासदारांना इशारा दिला.

मिरवणूक मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी श्री शाहू छत्रपतींचे स्वागत करण्यात येत होते. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून गेला होता. नागरिकांना अभिवादन करत रॅली दसरा चौक, व्हिनस कॉर्नर मार्गे पुढे मार्गस्थ झाली. हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागाने या मार्गावर जनसागर लोटल्यासारखी स्थिती होती. बसंत बहार रोड मार्गे रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. यावेळी कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा ‘शाहू छत्रपती की जय’ असा घोषणा केल्या. ‘कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज’ या घोषणांनी परिसर दुमदुमला. यानंतर शाहू महाराज छत्रपती हे महाविकास आघाडीच्या प्रमुख निवडक नेते मंडळीसोबत जाऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. शाहू छत्रपती यांनी 4 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी व रविकिरण इंगवले, शेकापचे युवा नेते क्रांती पवार-पाटील, अक्षय पवार-पाटील, सरचिटणीस बाबुराव कदम, भोगावती कारखान्याचे संचालक केरबा पाटील, दत्ता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासोा देवकर, काँग्रेसचे पदाधिकारी सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, सरलाताई पाटील, बाळ पाटणकर, दौलत कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील, शिवराज संकुल, गडहिंग्लजचे अध्यक्ष प्रा. किसन कुराडे, जनता दलाचे वसंतराव पाटील, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरे, डॉ. नंदाताई बाभूळकर, राष्ट्रवादीचे अमर चव्हाण, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दगडू भास्कर, लोकजनशक्ती संघटनेचे बाळासो भोसले, माजी महापौर अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, भीमराव पोवार, सागर चव्हाण, स्वाती यवलुजे, निलोफर आजरेकर, कॉ. अतुल दिघे, कॉ. दिलीप पवार, कॉ. चंद्रकांत यादव, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, अंबरिश घाटगे, पी. डी. धुंदरे, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, डॉ. रमेश जाधव, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, प्राचार्य टी. एस पाटील, प्रा. जे. के. पवार, माजी उपमहापौर विक्रम जरग, श्रीमती सुलोचना नाईकवडे, अर्जुन माने, माजी नगरसेवक जितेंद्र सलगर, राजाराम गायकवाड, प्रतापसिंह जाधव, रामदास भाले, ईश्वर परमार, मधुकर रामाणे, दिलीप शेटे, नियाज खान, रमेश पोवार, दत्ता टिपूगडे, राहूल चव्हाण, प्रकाश नाईकनवरे, उद्योगपती डी. डी. पाटील, रामराजे बदाले, मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, सुशील पाटील-कौलवकर, शिवशाहू संघटनेचे सज्जन पवार, वंचितचे नितीन पाटील, बाबासाहेब चौगुले, पर्यावरण कार्यकर्ते उदय गायकवाड आदी उपस्थित होते.

 



अर्ज भरताना नेत्यांची सोबत

 महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी आमदार पी. एन. पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील, माजी आमदार संजय घाटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभूळकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, कॉम्रेड दिलीप पवार वंचितचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी, अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण, सीए अमर पवार, अजित फराकटे, आदी उपस्थित होते.

 

शाहू छत्रपती महाराजांनी मानले आभार

शाहू छत्रपती महाराज यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जनतेने अलोट गर्दी केली होती. वेगवेगळे पक्ष, संघटना, तालीम संस्था, सार्वजनिक तरुण मंडळांचे पदाधिकारी यांचा सहभाग होता. या रॅलीनंतर शाहू छत्रपती यांनी या सर्वांचे आभार मानले. माझी उमेदवारी रयतेची आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. इंडिया आघाडी व महाविकास आघाडी आणि छत्रपती कुटुंबीयांवरील जनतेच्या प्रेमाची प्रचिती आली. अर्ज भरण्यासाठी जमलेल्या गर्दीने कोल्हापूरची जनता कोणासोबत आहे हे स्पष्ट झाले आहे. या सार्‍यांचा मी आभारी आहे, अशा शब्दात शाहू महाराजांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

.................................................................

छत्रपती कुटुंबीय जनतेसोबत

शाहू छत्रपतींचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत संपूर्ण छत्रपती कुटुंबीय सहभागी झाले होते. माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यशराजे हे छत्रपती घराण्यातील सदस्यांचा सहभाग होता. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ते रॅलीत होते. त्यांनी कार्यकर्त्यांशीही यावेळी संवाद साधला. तसेच हात उंचावून अभिवादन करताना प्रत्येकाला हात या चिन्हाला मतदान करून शाहू छत्रपतींना विजयी करावे, असे आवाहन केले.

........................................................................................ 

सरबत, पाणी बाटल्यांचे वाटप

रॅलीमध्ये नागरिकांच्या सुविधासाठी सरबतची व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. मुस्लिम बोर्डिंग येथे गणी आजरेकर आणि कादर मलबारी यांनी कार्यकर्त्यांसाठी कोकम सरबतची सोय केली होती. ते स्वतः आणि समाजातील कार्यकर्ते सरबत वाटप करीत होते. तर मानसिंग बोंद्रे फौंडेशनच्यावतीने व माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे यांच्या पुढाकाराने 30 हजारांहून अधिक पाण्याच्या बाटल्यांचे या रॅलीत वाटप करण्यात आले.

....................................................................

पैलवानांचा सहभाग

शहरातील सर्व तालमीतील 100 पैलवान फेटे बांधून रॅलीत सहभागी झाले होते. त्यांचे नेतृत्व हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी पै. विष्णू जोशीलकर, कुस्ती प्रशिक्षक चंद्रकांत चव्हाण यांनी केले.

....................................................................................

झुकेगा नही साला!

भाजप सरकारच्या राजवटीत इंधन गॅसच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली. वाढत्या महागाईच्या विरोधातील रोष नागरिकांनी मिरवणुकीत फलकाच्या माध्यमातून व्यक्त केला. कसबा बावडा येथील नागरिकांनी सिलेंडर टाकीच्या चित्रावर काँग्रेस काळातील 2014 मधील दर आणि आता भाजपच्या राजवटीतील गगनाला भिडलेली महागाई हे आकडेवारीसह मांडले होते. 2014 मध्ये सिलेंडर टाकी 440 रुपयाला मिळत होती तर आता ते दर 1241 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यावर म्हणायला काय जातंय अच्छे दिन अशी टिप्पणी केली होती. देशात हाय न्हवं लोकशाही, स्किमा करायच्या बंद करा, वाळल्या चौकशा बंद करा, अशा मजकुराच्या फलकातून भाजप सरकारवर कोरडे ओढले. शंभरी पार केलेल्या पेट्रोल दरवाढीवर नागरिकांनी चांगलेच फटकारले होते. 100 रूपये पेट्रोल... झुकेगा नही साला! हा फलक चर्चेचा ठरला.

...........................................................................

 सतेज पाटील आणि मालोजीराजेंनी झेंडा फिरवला 

दसरा चौक परिसरात आमदार सतेज पाटील, मालोजीराचे छत्रपती, गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे, माजी नगरसेवक राजू लाटकर यांना कार्यकर्त्यांवर खांद्यावर घेतले होते. त्यावेळी सतेज पाटील आणि मालोजीराजे यांनी काँग्रेस पक्षाचा झेंडा हवेत फिरवला. ते पाहून उत्साही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

...........................

हलगी ताशाच्या तालावर महिलांचा नृत्याचा फेर

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक नियाज खान यांनी जंगी रॅली काढत दसरा चौकात प्रवेश केला. महिला कार्यकर्त्यांनी भगव्या साड्या आणि शिवसेनेच्या मशाल चिन्हाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. हलगी ताशाच्या तालावर महिलांनी नृत्याचा फेर धरला होता.

.................................................................................

डाव्यांच्या लाल टोप्या ठरल्या लक्षवेधी

आयटक कामगार संघ, करवीर कामगार संघ, कोल्हापूर फेरीवाले संघटना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाल टोप्या परिधान करुन मिरवणुकीत सहभाग नोंदवत लक्ष वेधून घेतले.

...............................................................................

माझ्या राजाला निवडून आणायचं हाय...

दसरा चौक येथे उभ्या करण्यात आलेल्या प्रचार रॅलीमधील रिक्षात बसून न थकता 80 वर्षाचे आजोबा ‘माझ्या राजाला निवडून आणायचं हाय... कोल्हापूरचा विकास साधायचा हाय...’ हे गीत सादर करत त्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.

.............................................................................

रॅली मार्गावर कार्यकर्त्यांचे मोहोळ

आजच्या रॅलीला कार्यकर्त्यांचा उस्फूर्त पाठिंबा मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली पोहोचल्यानंतर रॅलीचे शेवटचे टोक हे दसरा चौकात होते. याचाच अर्थ असा की प्रारंभापासून रॅलीच्या अखेरपर्यंत गर्दी कायम होती.

...................................................................................

दसरा चौक ‘इंडिया’मय

दसरा चौकात काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन वंचित आघाडी, रिपब्लिकन पार्टी, आम आदमी पार्टी, बळीराजा शेतकरी संघटना अशा विविध पक्ष संघटना सहभागी झाल्यामुळे इंडिया आघाडी दसरा चौकात अवतरल्याचे भासत होते.

 

भगवे ध्वज, शिवशाहूंचा जयजयकार आणि नेत्यांचे फोटो

रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांची चित्रे असलेले ध्वज मोठ्या संख्येने झळकत होते. कार्यकर्ते भगवा ध्वज फडकावत जयघोष करत होते. शिवशाहूंचा अखंड जयजयकार सुरू होता. शिवाय काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे फोटो असलेले फलक रॅलीमध्ये होते.