कसबा बावडा-
राजाराम कारखान्याची वार्षिक सभा शुक्रवार दि. २९/०९/२०२३ रोजी संपन्न होत आहे. या सभेसाठी सर्व सभासद बंधू भगिनींनी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांनी केले आहे.
सभेसाठी ज्या सभासदांनी प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांची रितसर लेखी उत्तरे प्रश्नकर्त्या सभासदांना रजिस्टर पोस्टाने पाठविली आहेत. याशिवाय कारखान्याच्या छत्रपती राजाराम अॅपवर देखील सर्व सभासदांच्या माहितीसाठी प्रसिध्द केली आहेत. या व्यतिरिक्त या संदर्भात अधिक खुलासेवार माहिती वार्षिक सभेच्या वेळी दिली जाईल. कारखान्याचे कामकाज पारदर्शीपणाने सुरू असून या संदर्भात संचालक मंडळावर सभासदांचा पूर्ण विश्वास असून तो आम्ही जपणार आहोत. याचसाठी सभेकरीता सर्व सभासदांनी उपस्थित राहून आम्ही नियोजित केलेल्या प्रकल्प उभारणी कामास सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा अमल महाडिक यांनी व्यक्त केली आहे.
सभासदांच्या संपर्क दौऱ्यामध्ये सभासदांनी आमच्या नियोजनावर व कामकाजावर समाधान व्यक्त केले आहे. सभासद आमच्या पाठीशी असून कारखान्याच्या भविष्यातील प्रगतीसाठी ते निश्चितच साथ देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राजकीय भावनेतून टिका टिप्पणी करणाऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही फक्त कारखाना आणि सभासदांचे हित कसे जोपासले जाईल याचाच विचार करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.