उत्कृष्ट समाजसेविका मा. राणी मॅडम
schedule29 Jan 26 person by visibility 13 categoryसामाजिक
कोल्हापूर :
गेल्या दहा वर्षांपासून राणी मॅडम या सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय असून, शाहू–फुले–आंबेडकर विचारधारेवर आधारित कार्यातून समाजातील दुर्बल, गरजू व वंचित घटकांना आधार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी उभारले आहे.
मा. राणी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली विविध धम्म परिषदांचे आयोजन, नियोजन व सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय मदत, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य व मार्गदर्शन, महिलांसाठी समुपदेशन व आधारकार्य, तसेच आपत्ती व अडचणीच्या काळात तत्काळ मदतकार्य—अशा बहुआयामी उपक्रमांतून त्यांनी समाजहित जपले आहे.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गुगवाड येथील धम्मभूमी बुद्ध विहाराच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी एक हजार महिलांना तीन दिवसांसाठी निवास व्यवस्थेसह सहभागी करून घेतले. याशिवाय, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बौद्ध पौर्णिमा तसेच दर रविवारी महिलांना व मुलांना बौद्ध विहारांमध्ये धम्मकार्याचे प्रशिक्षण व माहिती देण्याचे कार्य त्या सातत्याने करत आहेत. लेणी संवर्धन व लेणी बचाव कार्यक्रमांअंतर्गत विविध सहलींचे आयोजन व नियोजन त्या स्वतः वेळ देऊन करत असतात, हेही त्यांच्या कार्यातील आणखी एक महत्त्वाचे योगदान आहे.
या सर्व कार्यात प्रसिद्धी, फोटो किंवा जाहिरात यांपेक्षा प्रत्यक्ष कृतीला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. निःस्वार्थ भावनेने आणि ठाम सामाजिक बांधिलकीतून केलेले त्यांचे कार्य अनेक कुटुंबांना आधार देणारे, समाजात सकारात्मक बदल घडविणारे व प्रेरणादायी ठरत आहे.