सीपीआरमधील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ सादर करा : आमदार राजेश क्षीरसागर
schedule19 Jan 25 person by visibility 63 category
*सीपीआरमधील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ सादर करा : आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रशासनास*
कोल्हापूर दि.१९ : कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सीमा भागातील नागरिकांसाठी सीपीआर रुग्णालय जीवनवाहिनी आहे. याठिकाणी कोणताही गैरकारभार होता कामा नये याची खबरदारी सर्वांनी घेतलीच पाहिजे परंतु, फेरीवाल्यांवर अन्याय करून त्यांचा उघड्यावर पाडण्याचा प्रकारही खपवून घेतला जाणार नाही. नियमानुसार प्रथम फेरीवाल्यांचे पुनर्वसन करा मगच अतिक्रमणाची कारवाई करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिष्ठाता सत्यवान मोरे यांना दिल्या.
आज सकाळीच सीपीआर प्रशासनाच्यावतीने पोलीस फौजफाट्यात सीपीआर मधील अतिक्रमण काढण्यास सुरवात करण्यात आली. यावेळी फेरीवाल्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना संपर्क करून होणाऱ्या अन्यायकारक कारवाईची माहिती दिली. आमदार राजेश क्षीरसागर यांनी तात्काळ सीपीआर रुग्णालयास भेट देत कारवाईची माहिती घेतली.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, सीपीआर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून गोरगरीब कुटुंबातील लोक किरकोळ व्यवसाय करून आपला चरितार्थ चालवत आहेत. अतिक्रमणाला आम्ही पाठीशी घालणार नाही. परंतु, अन्यायकारक कारवाई होत असेल तर न्यायाची भूमिका ठेवणे गरजेचे आहे. याठिकाणी सन १९९५ पासून परवानाधारक फेरीवाले आहेत. जे नियमित फाळा, लाईटबिल, इतर शासकीय कर भरतात. अतिक्रमण कारवाई करताना त्यांचे नियमानुसार पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्यानंतर अतिक्रमण कारवाई करणे गरजेचे असताना प्रशासनाने अचानक अतिक्रमणाची मोहीम हाती घेतल्याने फेरीवाले रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे पुन्हा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून सीपीआरची ख्याती आहे, असे असताना याठिकाणी कोणावर अन्याय होत असेल तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे फेरीवाल्यांना विश्वासात घेवून प्रशासनाने तात्काळ बैठक घ्यावी. रुग्णालय आवारात रहदारीला अडथळा होणार नाही अशा व्यवसाययोग्य ठिकाणी फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, त्यांचे पुनर्वसन करावे, मगच अतिक्रमणाची कारवाई करावी. तोपर्यंत अतिक्रमण कारवाईस स्थगिती द्यावी, अशा सूचना आमदार क्षीरसागर यांनी दिल्या.
*सीपीआरमध्ये अवैध्य कारभाराला खतपाणी नको : आमदार क्षीरसागर*
यावेळी फेरीवाल्यांशी संवाद साधताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, सीपीआर रुग्णालय हा संवेदनशील भाग आहेत. जिल्ह्यातील रुग्णसेवेसह संवेदनशील शासकीय कामकाज या रुग्णालयात चालते. याठिकाणी काहीवेळा अवैद्य कारभार सुरु असल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत. रुग्णसेवेत कोणताही व्यत्यय येईल, रुग्णांची लुबाडणूक होईल असे कोणतेही प्रकार घडणार नाहीत. दिलेल्या परवान्या व्यतिरिक्त कोणत्याही अवैद्य वस्तूची विक्री केली जाणार नाही, जेणेकरून सीपीआर रुग्णालयाचे नाव बदनाम होईल असे कोणतेही कृत्य होणार नाही याची खबरदारी फेरीवाल्यांनी घ्यावी अशा सूचनाही फेरीवाल्यांना दिल्या.
यावेळी अधिष्ठाता सत्यवान मोरे, वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक कणेरकर, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, रुपाली वायदंडे, अभिजित राऊत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राज जाधव, कपिल केसरकर, कृष्णा लोंढे आदी उपस्थित होते.