डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा शुक्रवारी 12 वा दीक्षांत समारंभ
schedule20 Mar 24 person by visibility 210 categoryशैक्षणिक
डॉ. नितीन गंगणे मुख्य अतिथी
डॉ. शेखर भोजराज, बाळ पाटणकर यांना डॉक्टरेट
कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा १२ वा दीक्षांत समारंभ शुक्रवार दिनांक २२ मार्च २०२४ रोजी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. के.एल.ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अभिमत विद्यापीठ, बेळगावीचे कुलगुरू डॉ. नितीन गंगणे हे या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून दीक्षांत भाषण करणार आहेत. यावेळी स्पाईन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर भोजराज यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी.) तर क्रीडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आर. ए. (बाळ) पाटणकर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ( डी. लीट.) या पदवीने सन्मानित केले जाणार आहे. हॉटेल सयाजी येथील व्हिक्टोरीया सभागृहात सकाळी ११.०० वाजता दीक्षांत समारंभ होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपकुलसचिव संजय जाधव, परीक्षा नियंत्रक डॉ. अभय जोशी, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी डी लोखंडे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. राजेश ख्यालाप्पा आदी उपस्थित होते.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची स्थापना २००५ साली झाली. विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून यावर्षी नॅक “ए प्लस' मानांकन प्राप्त केले आहे. विद्यापीठाकडून पीएच.डी. प्राप्त केलेले बहुसंख्य विद्यार्थी देश-विदेशात संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. वैद्यकीय व परिचारीका महाविद्यालयाच्या माध्यमातून कोल्हापूर परीक्षेत्रातील गरीब व गरजू रूग्णांना मोफत सेवा दिली जात आहे. भौतिक उपचार व औषध निर्माण शास्त्र शाखेच्या माध्यमातून आरोग्यसेवेत योगदान देणारे विद्यार्थी घडवले जात आहेत. आंतरशाखीय वैद्यकीय विषयात पदव्युत्तर व संशोधन अभ्यासक्रम व अल्पकालीन पॅरामेडिकल अभ्यासक्रमही सुरू असल्याचे डॉ. मुदगल यांनी यावेळी सांगितले.
कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत करून पदवीदान कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यावेळी प्रमुख पाहुणे व डॉक्टरेटने सन्मानित करण्यात येणाऱ्या मान्यवरांच्या कार्याची माहिती त्यांनी दिली.
दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. नितीन गंगणे हे के. एल. ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, अभिमत विद्यापीठ बेळगावी येथे कार्यरत आहेत. यापूर्वी महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (MGIMS), सेवाग्राम येथे डीन म्हणून काम पाहिले आहे. १८० हून पब्लिकेशन्स त्यांच्या नावावर आहेत. कर्करोगावरील संशोधनासाठी त्यांना इंटरनॅशनल ग्रँड फेलोशिप मिळाली आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नियामक मंडळाचे सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन आणि शैक्षणिक परिषदेचे सदस्य व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठच्या सिनेटवरही त्यांनी काम केले आहे. 2006 ते 2009 या काळात ते इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष होते.
डॉ. भोजराज यांना डी. एस्सी.
दीक्षांत समारंभात डी. एस्सी. पदवीने सन्मानीत केले जाणारे डॉ. भोजराज हे जगविख्यात मणका रोग तज्ञ आहेत. स्पाईन फौडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष असेलेले डॉ. भोजराज हे लीलावती हॉस्पिटल, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल, गुरुनानक हॉस्पिटल येथे कॅन्सल्टंट स्पाईन सर्जन म्हणून ते कार्यरत आहेत. समाजातील गरीब लोकाना मणका उपचार करता यावेत यासाठी २०१९ मध्ये स्थापन केलेल्या स्पाईन फौडेशनच्या माध्यमातून गडचिरोली, आंबेजोगाई, औरंगाबाद, अकोला, रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी ते सेवा देत आहेत. आजपर्यंत त्यांनी मणक्याच्या १० हजाराहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. चित्रकला आणि फोटोग्राफी यांचीही त्यांना प्रचंड आवड आहे. स्पाईन सर्जरीसाठीच्या योगदानाबद्दल अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी डॉ. भोजराज यांना सन्मानित करण्यात आले आहे.
बाळ पाटणकर यांना डी.लीट
आर. ए. बाळ पाटणकर हे क्रीडाई महाराष्ट्र आणि कोल्हापूरचे माजी अध्यक्ष असून त्यांनी बांधकाम व्यावसायिकांसाठी बनवलेला ‘कोड ऑफ कंडक्ट’ आणि सुरु केलेला ‘दालन’ उपक्रम आजही नावजले जातात. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी तब्बल 35 वर्षे काम करून क्रिकेटच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. या माध्यमातून अनेक नामवंत क्रिकेटपटू घडविण्यात तसेच कोल्हापूरचे नाव क्रिकेट विश्वात उंचावण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड अर्थात नॅबची शाखा कोल्हापूरात सुरु करण्यात त्यांचा पुढाकार होता. या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून ते अंधांसाठी कार्यरत आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे. नागोजीराव पाटणकर हायस्कूलचे अध्यक्ष म्हणून ते शैक्षणिक क्षेत्रातही योगदान देत आहेत. मुलांना स्पर्धा परीक्षा विषय मार्गदर्शन व्हावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या अरुण नरके फाउंडेशनचे स्थापनेपासून 2019 पर्यंत तब्बल 25 वर्षे अध्यक्ष स्थान त्यांनी भूषवले आहे. हॉटेल टूरिस्ट आणि हॉटेल अट्रीयाच्या माध्यमातून हॉस्पिटलिटी क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे.
605 विद्यार्थ्यांना मिळणार पदवी
बाराव्या दीक्षांत समारंभात एकूण 605 विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. यावेळी 11 विद्यार्थ्याना सुवर्ण पदकाने गौरवण्यात येणार आहे. विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉ.जहागीरदार, डॉ. विनय वाघ आणि डॉ. मिलिंद सबनीस यांच्या नावाने पारितोषिके दिली जाणार आहेत.
डॉ. प्रीती प्रकाश बागवडे या विद्यार्थीनीला संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सुवर्ण पदक जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा नियंत्रक अभय जोशी यांनी दिली.