अनुभव, बुद्धी, विज्ञानाच्या कसोटीवर सत्य सांगणारा धम्म : प्रा डॉ. संतोष बनसोड
schedule14 Oct 23 person by visibility 409 category
कोल्हापूर : आवाज इंडिया प्रतिनिधी
अज्ञान दूर करणारा धम्माचा विचार जगाला तारणार आहे. धम्म हा अनुभव, बुद्धी, विज्ञानाच्या कसोटीवर जे सत्य आहे ते मानणारा आहे. त्यामुळे हा विचारच जगाला तारणार असल्याचे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य व डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी केले.
ते राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे धम्म संघ आयोजित 67 व्या धम्मदेशनामध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी धम्म संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक चौकाककर होते.
डॉ. बनसोड म्हणाले, पूर्वी ब्राह्मण यांनी एखाद्या मुलीवर बोट केलं तरी त्या मुली ब्राह्मणांना दिल्या जात होत्या. अशा अनिष्ट प्रथा हिंदू धर्मात होत्या म्हणून बाबासाहेब यांनी भारतीय गौतम बुद्ध यांचा विचार स्वीकारला.
बुद्धांच्या धम्मात स्त्री-पुरुष ही समान आहे. कर्मकांडांना थारा न देता सत्य सांगणारा विज्ञानवादी धम्म विचार आहे. यामध्ये सुद्धा अनेकांनी अनिष्ट प्रथा घुसवण्याचा प्रयत्न केला. त्या दूर करत बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा देत धम्म दिला. या धम्माचा प्रसार आणि प्रचार करणे गरजेचे आहे.
बाबासाहेब यांचा विचार आता सर्वांनाच पटू लागला आहे त्यामुळेच पुणे,अमरावती,मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमात आंबेडकरी चळवळीचा विचार केला जात आहे. धम्म स्वीकारण्यापूर्वीसुद्धा बाबासाहेबांनी 21 वर्षे याचा अभ्यास केला. विविध कार्यक्रमात स्वतः जाऊन धम्माचा प्रचार केला. सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या नावाने शिक्षण संस्था उभा केल्या. असेही बनसोड यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात चोकाककर म्हणाले, बाबासाहेबांनी जो सुधारित धम्म सांगितला तोच धम्म पुढे नेला तरच सुधारणा होणार आहे. अन्यथा विपश्यना अशा श्रद्धाळू गोष्टीमुळे हिंदू धर्मात आणि धम्मात काय वेगळा फरक राहिला नाही. महापुरुषांचा जन्मदिवस हा विचारांचा जागर म्हणूनच साजरा केला पाहिजे.त्याला सणाचे स्वरूप देता कामा नये.
यावेळी आंबेडकरी चळवळीचे विचारवंत प्रा. विनय कांबळे, शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख साहित्यिक प्रा. डॉ. जगन कराडे,प्रा. सिद्धार्थ पद्माकर,सचिन कपूर आदी मान्यवर उपस्थित होते.
आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक महाबोधी पद्माकर यांनी प्रस्तावित केले. इतिहास संशोधक प्रा. डॉ. चंद्रकांत कुरणे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.दीक्षा कुरणे यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक डॉ. डी एल कांबळे यांनी आभार मानले.
बाबासाहेब सात नातलगांच्या अंत्ययात्रेला येऊ शकले नाहीत.
शेवटी डॉ. बनसोडे यांनी बाबासाहेब स्वतःची चार मुले, सखे दोन भाऊ, एक सखी बहिण यांच्या अंत्ययात्रेला सुद्धा पोहोचू शकले नाहीत. कारण त्यावेळी ते वंचितांना न्याय देण्यासाठी सभेमध्ये हजर होते.आपण किती चळवळीसाठी त्याग करणार आहोत. बाबासाहेबांची चळवळपुढे नेण्यासाठी किती प्रयत्न करतोय याचाही विचार करावा असेही त्यांनी सांगितले.