
कोल्हापूर (आवाज इंडिया प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून अनेक वेळा शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत आला आहे. वाढीव बिलाने शेतकरी हैराण असताना सोळांकुर (ता. राधानगरी) येथील ग्राहकास तब्बल 78 हजार 724 रुपयाचे वाढीव बिल देण्यात आले.
मिलिंद विनायक कुलकर्णी या शेती ग्राहकास डिसेंबर 2019 ते मार्च 2022 या कालावधीची बिल तब्बल 95 हजार 340 रुपये आले. त्यांनी वारंवार तक्रार करून सुद्धा विद्युत वितरण कंपनीच्या तपासणीमध्ये न्याय मिळाला नाही.
कुलकर्णी यांनी ग्राहक चळवळीचे अभ्यासू संजय हुक्केरी यांच्याशी संपर्क साधला. हुक्केरी यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता ग्रामीण दोन कोल्हापूरचे संजय शिंदे व उपकार्यकारी अधिकारी अभियंता राधानगरीचे रामेश्वर कसबे यांना प्रतिवादी करत तक्रार दाखल केली. तक्रारदार कुलकर्णी यांना आधार देत त्यांनी सर्व प्रकरणाचा सखोल अभ्यास करून महावितरण यांच्या चुका लक्षात आणून दिल्या.
विद्युत वितरण कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण मंच मध्ये स्वतंत्र सदस्य श्रीकांत बाविस्कर, सचिव सुधाकर जाधव यांनी याबाबतचा पूर्ण अभ्यास करून ग्राहकांच्या बाजूने निकाल दिला. ग्राहकास वाढीव रक्कम कमी करून 16,616 रुपये भरून शेती ग्राहक कुलकर्णी यांना न्याय मिळवून दिला.
जागरूक ग्राहक चळवळीचे संजय हुक्केरी यांनी यापूर्वीही प्रशासनाच्या चुकीच्या वृत्ती बद्दल ताशोरे ओढले आहेत व ग्राहकांना न्याय मिळवून दिला आहे.