कशासाठी.... दुधासाठी
आवाज इंडिया लाइव्ह न्यूज प्रतिनिधी
अनुराधा कदम
वेळ सोमवारी सकाळी साडेअकराची. कोल्हापुरात लॉकडाउनचा पहिलाच दिवस. रविवारी रात्री त्या माऊलीने तान्हुल्यासाठी दूध आणून ठेवलं. सोमवारी ते दूध तापवताना नासलं. आठ महिन्याचं बाळ दुधासाठी रडू लागल्यावर ती आई दूध आणण्यासाठी बाहेर पडली. मास्क, सॅनिटायझरसह सगळी काळजी तिने घेतली. दूध जीवनावश्यक घटकात येत असलं तरी सकाळी सहा ते नऊ ही वेळ दूध आणण्यासाठी दिली आहे. लेकराच्या दुधासाठी बाहेर पडलेली ती आई या वेळेच्या परीघाबाहेर होती. माऊली घरापासूनच्या पुढच्या चौकात येताच तिला पोलिसांनी अडवलं. बाळाला दूध आणायला आलेय असं सांगूनही तिला पुढे सोडलं नाही. दूध आदल्या दिवशी आणून ठेवायचं… नासणार हे गृहित धरून फ्रीजमध्ये ठेवायचं अशा पर्यायांची शिदोरी देऊन नकारघंटा वाजवत पोलिसांनी तिला माघारी धाडलं. हे सगळं त्या रस्त्यावर असलेला एक नागरीक घराच्या गच्चीतून पाहत होता. त्याच्याही घरी लहान मूल असल्याने त्याने मिल्कपावडरचे पाऊच खरेदी केले होते. त्यातले दोन पाऊच त्या भल्या माणसाने माऊलीकडे सोपवले आणि पर्याय केवळ सांगितला नाही तर तो तिला उपलब्ध करून दिला. बाळाच्या एक कप दुधासाठी माऊलीला नियमाच्या कात्रीत अडकवले. मग… दूध आंदोलनात हजारो लिटर दूधाचे पाट ओतणाऱ्या आंदोलकांसाठी रस्त्यावरच्या पोलिसांची शिट्टी का वाजली नाही… लॉकडाउन नियमाचे पारायण का केले गेले नाही. बुलढाण्यात आंदोलकांनी दुधाने आंघोळ केली. सांगलीत महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार ओतली गेली. कोल्हापुरात दुधाच्या टँकरचा नळ सोडण्यात आला. हे सगळं लॉकलाउनच्या दुसऱ्या दिवशी भर रस्त्यात सुरू होतं. मान्य शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे…पण इतकं मस्तीला येणाऱ्या आंदोलकांना बालसंकुलातील तान्हुल्यांची…वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची…गेल्या चार महिन्यांपासून पाठीला चिकटलेल्या पोटाला चिमटा देत जगणाऱ्या गोरगरीबांची आठवण का झाली नाही…? आंदोलक हा संवेदनशील असावा लागतो… शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारा तर संवेदनशील असावाच… एकीकडे लेकराच्या दुधाची तहान भागवण्यासाठी घराबाहेर आलेल्या माऊलीला नियमाचा दंडुका…आणि दुसरीकडे आंदोलनाच्या नावावर दुधाचा अपमान करणाऱ्यांना अभय… ? कोरोना कधी ना कधी जाईल…पण या वृत्तीचा संसर्ग नक्कीच समाजाला पोखरेल अशी भीती आहे.
@अनुराधा कदम
@अनुराधा कदम