कोल्हापूर आवाज इंडिया
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे बहुजनांचे कैवारी होते. कोल्हापूर संस्थान जगभरात रोल मॉडेल म्हणून पुढे आणण्याचे त्यांचे स्वप्न होते. म्हणून त्यांनी कोल्हापूर संस्थानात विविध प्रयोग केले आणि कोल्हापूर सुजलाम सुफलाम केले. छत्रपती शाहू महाराज यांचे लोकोत्तर कार्य जनमानसात पोहोचवणे हीच त्यांना स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आदरांजली असेल असे मत इतिहास अभ्यासक आणि महाराष्ट्र शासनाच्या राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य प्रा. डॉ. कपिल राजहंस यांनी व्यक्त केले.
इचलकरंजी येथील जयवंत महाविद्यालयाचा एन एस एस विभाग यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य बी एस पाटील हे होते.
ते पुढे म्हणाले की, आरक्षणाचे जनक अथवा गावकुसाबाहेर टाकलेल्या लोकांना व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे शाहू महाराजांचे कार्य आपल्याला सांगितले जाते मात्र त्या पुढे जाऊन सुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे एक विकास पुरुष होते. कृषी, उद्योगधंदे, जलसंधारण, महिला सक्षमीकरण आदींबाबत राजर्षी शाहू महाराजांचा दृष्टिकोन जनमानसात येणाऱ्या काळात आपल्याला जाणीवपूर्वक पोहोचवावा लागेल.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बी. एस. पाटील म्हणाले की, शाहू महाराज हे काळाची पावले ओळखणारे राजे होते. कोल्हापूरची ओळख जगभरात आज आहे त्याचे श्रेय केवळ आणि केवळ शाहू छत्रपती महाराज यांना आहे. शाहू महाराज समजून घ्यायचे असतील तर विद्यार्थी दशेत चौफेर वाचन आवश्यक आहे.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रफिक सुरज यांनी शाहू महाराजांच्या काही आठवणींना उजाळा दिला.
स्वागत प्रास्ताविक प्रा. शांताराम कांबळे यांनी केले, आभार प्रा. विजयकुमार साठे यांनी मानले.
यावेळी डॉ. माधुरी खोत, डॉ. शकुंतला पाटील, डॉ. वैजयंता पाटील, डॉ. वसंत भागवत, प्रा. गजेंद्र माळी, प्रा. संपतराव जाधव, डॉ. मोहन जोशी, प्रा. योगेश माळी, प्रा. सुनील बुढे, राजेंद्र लोखंडे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.