सिंधी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध - अमल महाडिक
schedule15 Nov 24 person by visibility 35 category
*येथील संत साई मंदिराच्या भेटीदरम्यान अभिवचन*
कोल्हापूर - गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या परिसरात मोठ्या प्रमाणात सिंधी समाज आहे. या बाजारात लाखोंच्या उलाढाली होत असतात. त्यामानाने येथील नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. या समाजाच्या विकासासाठी मी नेहमी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांनी केले.
गांधीनगर येथे प्रचार पदयात्रेच्या दरम्यान सिंधी समाजाच्या संत साई मंदिराला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित सिंधी बांधवांशी संवाद साधला. या परिसरातील सिंधी बांधव दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत पायाभूत सुविधा सोडविण्यावर माझा भर आहे. या माध्यमातून त्यांना एका स्वच्छ, सुंदर व नीटनेटक्या परिसरात राहता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, असे ते यावेळी म्हणाले.
येथील सिंधी नागरिकांनी महाडिक यांच्याशी बोलताना त्यांना एका शांत व व्यवस्थापित भागाची अपेक्षा असल्याचे सांगितले. येथील वाहतूक कोंडी व धुळीने माखलेले, खड्ड्यांनी परिपूर्ण रस्ते बदलले पाहिजेत असेही नागरिकांनी त्यांना सांगितले. महाडिक यांनी यावेळी येणाऱ्या काळात प्राधान्याने या समस्या सोडवण्याचा शब्द दिला. यावेळी मंदिरात उषादीदींचा आशीर्वाद महाडिक यांनी घेतला.
उषादिदींनी त्यांना शुभेच्छा देत निवडणूक जिंकण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. अमल यांच्या शांत व समंजस स्वभावाचे कौतुक करत 'तुमच्या सारख्या नेतृत्वाची गरज आहे.' असे त्या म्हणाल्या. त्यांनी उपस्थित नागरिकांनाही २० नोव्हेंबर रोजी अमल महाडिक यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी बीएसएस ग्रुप व भाजप व महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व सिंधी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*चौकट*
*बहुस्तरीय पार्किंग व्यवस्था करणार*
गांधीनगर परिसरातील सर्वात महत्त्वाचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करणारा आहे. यासाठी बहुस्तरीय पार्किंग व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. सर्वप्रथम याच कामाला प्राधान्य देणार आहे. असे अमल महाडिक यावेळी म्हणाले.