गोकुळ दूध वितरक कमिशन वाढीच्या निर्णयाला विरोध;
schedule17 Aug 26 person by visibility 19 categoryराजकीय
दूध उत्पादकांवर अन्याय होत असल्याचा आरोप
कोल्हापूर:
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने दूध वितरकांना प्रति लिटर ४० पैसे कमिशन वाढवून देण्याच्या चर्चेवरून/निर्णयावरून दूध उत्पादकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या निर्णयामुळे संघाचे वार्षिक तब्बल २१ कोटी रुपयांचे नुकसान होणार असून, हा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उत्पादकांवर अन्याय: गोकुळ संघाने ११ ऑगस्ट २०२६ पासून म्हैस दूध विक्री दरात २ रुपयांची वाढ केली आहे. मात्र, प्रत्यक्ष म्हैस दूध खरेदी दरात केवळ १.५० रुपये (दीड रुपया) वाढ देण्यात आली आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीत दूध खरेदी दरात किमान २.०० रुपयांची वाढ अपेक्षित होती.
संघाच्या आर्थिक शिस्तीला फटका: वितरकांना अतिरिक्त ४० पैसे कमिशन वाढवून दिल्यास संघावर वार्षिक सुमारे २१ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडेल. यामुळे संघाच्या दीर्घकालीन हिताला बाधा पोहचेल व आर्थिक शिस्त बिघडेल.
कमिशन वाढ थांबवण्याची मागणी: प्रशासकीय काळात दूध व्यवसायाला योग्य प्रोत्साहन देण्याऐवजी असा निर्णय घेणे अन्यायकारक आहे. त्यामुळे वितरक कमिशन वाढीचा निर्णय त्वरित थांबवावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
हे निवेदन संग्राम दत्तात्रय पाटील (श्री राम सह. दूध व्याव. संस्था मर्या., शिंगणापूर, ता. करवीर) आणि सिताराम बाबू पाटील (श्री आयलक्ष्मी महिला सह. दूध व्याव. मर्या., धांगडे, ता. पन्हाळा) यांच्यासह अन्य प्रतिनिधींनी दिले आहे. यावेळी
युवराज भोसले, विश्वावराव इंगवले, बाबासाहेब पाटील, युवराज पाटील विलास पाटील किरण पाटील, आदी मान्यवर यांनी दूध दरवाढीबाबत सूचना दिली.
याबाबत प्रशासक प्रदीप मालगावे यांनी दूध उत्पादकाच्या हिताचे निर्णय घेतले जातील असे सांगितले.