एस. पी. दिक्षित यांना ‘महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार’
schedule09 Nov 25 person by visibility 15 categoryशैक्षणिक
कोल्हापूर
सुळकुड (ता. कागल) — सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लक्ष्मीबाई पाटील हायस्कूल व जुनियर कॉलेज, सुळकुड येथील मुख्याध्यापक प्रा. एस. पी. दिक्षित यांना यंदाचा ‘महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. कृती फाउंडेशन यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे कोल्हापुरात लवकरच पुरस्कारचे मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे.
प्रा. दिक्षित हे बी.ए., बी.एड. पदवीधर असून, त्यांनी गेली २८ वर्षे अध्यापन क्षेत्रात यशस्वीपणे कार्य केले आहे. त्यांनी हिंदी, इतिहास, भूगोल, मराठी तसेच एम.सी.सी. या विषयांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. दोन वर्षे ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
अध्यापनासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स, स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती आदींसाठी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत — दोन विद्यार्थी परदेशात एमबीबीएस शिक्षण घेत आहेत, तर एक विद्यार्थिनी हिंदी प्रचार समितीच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या शिष्यांपैकी सात विद्यार्थ्यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाला असून, अनेक विद्यार्थी प्रशासकीय, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेचे कार्य करत आहेत.
प्रा. दिक्षित हे भारतीय बौद्ध महासभेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून गेली १७ वर्षे कार्यरत असून, सध्या ते समता सैनिक दलाचे लेफ्टनंट कर्नल म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. जिल्ह्यातील १२ केंद्रीय शिक्षक व २१७ सैनिक त्यांच्याखाली कार्यरत आहेत. त्यांनी औरंगाबाद राष्ट्रीय अधिवेशनात पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे.
सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. बारा तालुक्यांत त्यांनी धम्मपरिषदा, संस्कार शिबिरे, संविधान वाचन उपक्रम राबवले. २०२२ मध्ये माणगाव अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद भूषवून त्यांनी ऐतिहासिक कार्य केले.
सध्या त्यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ४५० फूट उंच बुद्धमूर्ती, १००० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय आणि जागतिक पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा अभिनव उपक्रम सुरू आहे.
प्रा. दिक्षित म्हणाले, “शिक्षक हा केवळ अध्यापनापुरता मर्यादित नसून, समाज परिवर्तनाचाही शिल्पकार असावा. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करून समाज जागृत करणे हीच खरी शिक्षकी सेवा आहे.”
त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना ‘महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार’ जाहीर झाला असून, सुळकुड परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे