जागतिक वारसा स्थळांचे महत्व आणि संवर्धन
schedule01 Feb 21 person by visibility 4806 categoryलाइफस्टाइल
मानवी जीवनाच्या अनुशंगाने भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यावरणाला महत्व आहे. पृथ्वीवरील भौगोलिक पर्यावरणातील जागतिक वारसा स्थळे ही ऐतिहासिक, सांस्कृतिक, पर्यटन व रोजगार या दृष्टीनेही महत्वाची आहेत. पण विकासाच्या नावाखाली नैसर्गिक व सांस्कृतिक पर्यावरणामध्ये मानवाने केलेले बदल व हस्तक्षेप जैवविविधतेबरोबरच ऐतिहासिक व सांस्कृतिक घटकांनासुध्दा धोकादायक ठरत आहेत त्यांचे जतन व संवर्धन होणे व त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था अथवा युनेस्को च्या रूपाने जागतिक वारसा स्थळांचे जतन करण्याचे काम सुरू आहे. जागतिक वारसा स्थळांचे जे काही हॉट स्पाॅट निर्माण झालेले आहेत त्यावर विशेष लक्ष देऊन त्यांचे संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. युनोस्कोने जगभरातील वारसा स्थळाची यादी तयार केली आहे. या वारसा स्थळाचे जतन, संवर्धन, देखभाल व अनुदान ही त्यांचेकडून दिले जाते. जगभरात 1121 जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यामध्ये नैसर्गिक (213), सांस्कृतिक (869) व मिश्र स्वरूपाची (39) अशी आहेत. जगभरात लॅटिन अमेरिका व कॅरिबियन (142), युरोप व उत्तर अमेरिका (529), आशिया व पॅसिफिक (268), अरब (86) आणि आफ्रिका (96) अश्या भौगोलिक विभागात त्यांची विभागणी केली आहे. जगात सगळ्यात जास्त वारसा स्थळे ही इटली आणि चीन (55) या दोन्ही देशांमध्ये आहेत. त्यानंतर अनुक्रमे स्पेन (४८), जर्मनी (४६), फ्रान्स (४५) आणि भारत (38) हे देश आहेत. भारतामध्ये विविध राज्यांमध्ये जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दिल्ली मधील कुतुब मिनार, हुमायूनचा मकबरा व लाल किल्ला हे जागतिक वारसा स्थळ यादीत आहेत. मध्य प्रदेशातील भीमबेटकाच्या अश्मकालीन गुंफा, सांचीचा स्तूप व खजुराहोची मंदिरे यांचा समावेश वारसा स्थळामध्ये आहे. राजस्थानातील जयपूर शहर, हिल फोर्ट, जंतरमंतर खगोल प्रयोगशाळा व केवलदेओ राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा किल्ला, फत्तेपूर सिक्री व ताजमहाल हे सुध्दा या यादीत आहेत. आसाम मधील काझीरंगा व मानस ही अभयारण्ये, गुजरातमधील रानी की वाव व चंपानेर-पावागड, अहमदाबाद शहर हे ही समाविष्ट आहेत. कर्नाटक मधील विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी व पट्टडकल येथील चालुक्यांची मंदिरे यादीत समाविष्ट आहेत. तामिळनाडूतील चोल राजाची मंदिरे, महाबलीपुरम यादीत आहे. बिहार मधील महाबोधी मंदिर, बोध गया, नालंदा विद्यापीठ (महाविहार) यांचा समावेश आहे. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल, भारतातील पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे), नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तरांचल त्याचबरोबर सिक्किम मधील खांगचेंडझोंगा राष्ट्रीय अभयारण्य, चंडीगड़ येथील कैपिटल इमारत संकुल, हे ठिकाणे जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ठ आहेत. देशात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पाच जागतिक वारसा स्थळे आहेत. अजंठा व वेरुळची लेणी, एलेफंटा/घारापुरीची लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, तसेच दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन निओ गॉथिक आणि आर्ट डेको इमारत, पश्चिम घाट यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा आहे व ती जपणे गरजेचे आहे. राज्याच्या पर्यटन उद्योगाच्या दृष्टीने ही वारसा स्थळे महत्वाची आहेत त्यांचे जतन व संवर्धन झाले तर पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. पर्यटनांमुळे स्थानिक विकास साधण्यास मदत होईल. असे असले तरी वारसा स्थळांचे जतन करणे हे सुध्दा एक मोठे आव्हाण आहे. त्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे व वारसा स्थळांचे महत्व समजणे आवश्यक आहे. राज्यामध्ये वारसा स्थळाबरोबरच जे काही ऐतिहासिक गडकोट किल्ले आहेत त्यांचे सरंक्षण व जतन करणे हे ही महत्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकांनी जबाबदारीने काम करणे अपेक्षित आहे व ऐतिहासिक ठिकाणांचे महत्व जाणणे गरजेचे आहे. शासन स्तरावर संवर्धनासाठी विविध उपाय योजना केल्या जातात तसेच काही मार्गदर्शक तत्वे ही सांगितली जातात त्यांचे पालन करणे ही अपेक्षित आहे. जागतिक वारसा स्थळांच्या जतन आणि सरंक्षणाच्या माध्यमातून भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा जपली जाईल. जागतिक वारसा स्थळांच्याबद्दल जागरूकता व महत्व असणे गरजेचे आहे. हा ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढीसाठी शिल्लक ठेवायचा असेल तर त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकांने घेणे अपेक्षित आहे.
डाॅ. युवराज शंकर मोटे
भूगोल व पर्यावरण अभ्यासक,
कोल्हापूर
मो.9923497593
ईमेल:ysmote@gmail.com