*
कोल्हापूर, (जिमाक): राज्य शासन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांच्या सहभागाने नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण तसेच पाण्याची बचत या कार्यक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ग्रीन क्लबच्या विद्यार्थी प्रतिनिधींच्या क्षमता बांधणीसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन राजाराम महाविद्यालयात करण्यात आले.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील ग्रीन क्लबचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते. कार्यशाळेत प्रतिभा दीक्षित प्रमुख अतिथी तर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वाय.सी. आत्तार अध्यक्षस्थानी होत्या. कार्यशाळेस डॉ. अशोक उबाळे विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण यांनी भेट दिली. जिल्हा नोडल अधिकारी डॉ. चीघलीकर यांनी युनिसेफ, एक्वा डॅम, पर्यावरण शिक्षण केंद्र यांचे प्रतिनिधी अदित्य जाधव, अवधूत अभ्यंकर, तसनीम तीनवाला यांच्या मदतीने कार्यशाळेमध्ये ग्रीन क्लबच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पाणीबचतीच्या उपाय योजना, दैनंदिन पाणी बचत व पाणी बचतीच्या नोंदी कशा कराव्यात, ग्रीन क्लब विद्यार्थी प्रतिनिधींची जबाबदारी आणि क्षमता बांधणी करणे यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रीन क्लब समन्वयक डॉ. ज्योती चव्हाण, डॉ. सुरज सोनावणे, डॉ. अतुल पाटील यांनी कार्यशाळेचे नियोजन केले.
00000