“एक पाऊल प्रगतीकडे, जिल्हा परिषद अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे!”
schedule12 May 26 person by visibility 34 categoryराजकीय
कोल्हापूर : आवाज इंडिया प्रतिनिधी
ना. हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत ‘ॲक्शन मोड’मध्ये; प्रत्येक तालुक्यात होणार थेट आढावा बैठक
कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी आणि शासनाच्या योजना प्रत्यक्ष शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहेत का, याची खातरजमा करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पा शशिकांत खोत यांनी एक धडाकेबाज आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार अध्यक्षा आता स्वतः प्रत्येक तालुक्यात जाऊन विकासकामांचा आणि प्रशासकीय यंत्रणेचा थेट आढावा घेणार आहेत.
“एक पाऊल प्रगतीकडे, अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे!” या संकल्पनेतून सुरू होत असलेल्या या विशेष उपक्रमामुळे जिल्हा परिषद प्रशासनात मोठी हालचाल सुरू झाली असून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दौऱ्याची सुरुवात १३ मे २०२६ रोजी गडहिंग्लज तालुक्यातून होणार असून पुढील महिनाभरात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा पूर्ण केला जाणार आहे. या आढावा बैठकींना जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सभापती, संबंधित तालुक्यातील पंचायत समितीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सामान्यतः जिल्हा परिषदेच्या बैठका मुख्यालयात होत असतात. मात्र, अध्यक्षा शिल्पा खोत यांनी “फाईलवरील आढावा” न घेता “प्रत्यक्ष फिल्डवरील वास्तव” जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रशासन थेट गावपातळीवर उतरून कामकाजाचा हिशेब देणार आहे.
या बैठकींमध्ये विशेषतः रस्ते, पाणीपुरवठा, शाळा दुरुस्ती, आरोग्य सेवा, महिला व बालकल्याण विभागाच्या कामांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’सह विविध शासकीय योजनांचा लाभ खरोखरच नागरिकांपर्यंत पोहोचतोय का, याची तपासणी केली जाणार आहे. ग्रामीण आरोग्य केंद्रे आणि शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतही कडक सूचना देण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत जागेवरच चर्चा करून तत्काळ तोडगा काढण्यावर अध्यक्षा शिल्पा खोत यांचा भर असणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता आपल्या समस्या मांडण्यासाठी जिल्हा मुख्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही.
ना. हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा उपक्रम जिल्हा परिषद प्रशासनात पारदर्शकता, जबाबदारी आणि गतिमानता आणणारा ठरणार असल्याची चर्चा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे. “प्रशासनाने जनतेच्या दारी जाऊन काम केले पाहिजे, हीच मंत्री हसन मुश्रीफ साहेबांची भूमिका आहे. त्यांच्या सूचनेनुसार प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेणार असून विकासकामांना अधिक गती देणार आहोत,” अशी स्पष्ट भूमिका अध्यक्षा शिल्पा खोत यांनी व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, शाळांच्या इमारतींची कामे आणि आरोग्य सुविधांबाबत आता थेट अध्यक्ष स्तरावरून आढावा घेतला जाणार असल्याने जिल्ह्यातील ग्रामस्थांमध्ये नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांची ही ‘सक्रिय’ आणि ‘मैदानी’ भूमिका ग्रामीण विकासासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.