निपाणी-गारगोटी रोडवर ३.६३ लाखांच्या मुद्देमालासह गुटखा आणि कार जप्त
schedule12 May 26 person by visibility 38 categoryराजकीयगुन्हे
कोल्हापूर: आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते. या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धडक कारवाई करत निपाणी-गारगोटी रोडवर हमीदवाडा फाटा येथे १,१३,७४० रुपये किमतीचा अवैध गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार जप्त केली आहे.
नेमकी घटना काय?
आज दिनांक १२ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार गजानन गुरव यांना निपाणी ते गारगोटी रोडवरून गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने हमीदवाडा फाटा येथे सापळा रचला.
यादरम्यान MH-09-EU-0409 या क्रमांकाची अल्टो कार संशयास्पदरीत्या येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवून चालकाची विचारपूस केली असता त्याने आपली ओळख संजय दशरथ कल्याणकर (वय ४१ वर्ष, रा. सोनारवाडी, ता. भुदरगड) अशी सांगितली. कारमधील मालाबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पंचासमक्ष कारची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा मिळून आला.
जप्त केलेला मुद्देमाल
कारमध्ये विविध कंपन्यांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ सापडले, ज्यामध्ये प्रामुख्याने खालील मालाचा समावेश होता:
- आर.एम.डी. पान मसाला
- विमल पान मसाला व वि-१ तंबाखू
- कोल्हापुरी पान मसाला, राज जर्दा, एम सेंटेड टोबॅको
- मुसाफिर पान मसाला आणि M-4 रॉयल जाफरानी जर्दा
पोलिसांनी १,१३,७४० रुपयांचा गुटखा आणि गुटखा वाहतुकीसाठी वापरलेली अल्टो कार असा एकूण ३,६३,७४० रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त केला आहे.
तपास आणि पथक
याप्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मुरगूड पोलीस करत आहेत.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धरजकुमार आणि पोलीस उपअधीक्षक (करवीर विभाग) श्री. सुजीतकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, गजानन गुरव, परशुराम गुजरे, वैभव पाटील, संतोष बरगे, प्रदिप पाटील, सत्यजित तानुगडे, महेंद्र कोरवी, संजय हुंबे, रोहीत मर्दाने व विजय इंगळे यांचा समावेश होता.