*
-काँग्रेस आमदारांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधून योग्य त्या अटी व शर्थींच्या आधारे गणेशोत्सवास परवानगी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, यांनी जिल्हा पोलीस अधीक्षककडे निवेदनाद्वारे केली आहे.
काँग्रेस आमदारांनी निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर शहर व जिल्हा परिसरातील बहुसंख्य तरुण मंडळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. यावर्षी फक्त श्री गणेश आगमनाच्या आणि विसर्जनाच्या दिवसाकरीताच मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात येणार असून इतर दिवशी मिरवणुक काढल्यास ती बेकायदेशीर ठरवून मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.
मात्र, गणेशोत्सव तिथीनुसार साजरा करण्यावर तरुण मंडळांचा भर असतो. नैसर्गिक आपत्तीमुळे वेगवेगळ्या साधन सामुग्रीचा असलेला अभावामुळे श्री गणेशमुर्ती तयार करणे, आरास याला उशीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश मुर्तींचे आगमन व विसर्जन यामध्ये विलंब होऊ शकतो. त्यामुळे एकाच दिवशी मिरवणुकीसाठी परवानगी दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे याबाबत विचार करुन सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे होण्यासाठी तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधून गणेशोत्सवास योग्य त्या अटी व शर्थींच्या आधारे परवानगी देणेत यावी अशी विनंती आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील,आमदार जयश्री जाधव यांनी या पत्राद्वारे केली आहे.