वंचितांना न्याय देणारे दत्तात्रय पाटील सर
schedule27 Nov 25 person by visibility 9 categoryशैक्षणिक
कोल्हापूर | प्रतिनिधी
डॉ. डी. वाय. पाटील मराठी कॉन्व्हेंट स्कूल, गारगोटी येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय बचाराम पाटील हे गेली ३५ वर्षे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक कार्यात निःशब्दपणे योगदान देत आहेत. सामाजिक कार्याची जाहिरात नको, पण कार्य मात्र अखंड सुरू ठेवायचे—या तत्त्वावर ते कार्यरत असून त्यांच्या पत्नीने दिलेली निःस्वार्थ साथ हीच त्यांच्या सेवाभावाची ताकद असल्याचे ते सांगतात.
गरजू, दीनदुबळे, निराधार, महिला, मुले, शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलींना मदतीचा हात देत त्यांनी अनेकांना जीवनात नव्याने उभे केले आहे. शिक्षणापासून दूर गेलेल्या संगीता दत्तात्रय पाटील आणि संगीता बळीप या मुलींना स्वतःच्या खर्चाने सातवीपर्यंत शिक्षण देऊन आज त्या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. या मुलींची राहण्याची व जेवणाची व्यवस्था पाटील दाम्पत्याने स्वतःच्या घरी मोफत केली.
आई–वडील नसलेल्या सुप्रिया अशोक पाटील (रा. देसाईवाडी) हिला बारावीपर्यंत शिक्षण देऊन तिला स्थिर संसारात पाठविण्यात पाटील दाम्पत्याचा मोठा वाटा आहे. मुंबईहून कसबा वे, ता. राधानगरी येथे आलेल्या श्रुतिका व सार्थक चव्हाण या भावंडांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा त्यांनी घेतलेला धडपडीचा उपक्रमही समाजात आदर्श मानला जातो. आज ही मुले सातवी-आठवीत यशस्वीपणे शिक्षण घेत आहेत.
तुरंबे (ता. राधानगरी) येथील कुमारी श्रुतिका साबळे हिला दहावीपासून आजवर मोफत राहण्याजेवणाची व्यवस्था करून शिक्षण दिले. पित्याचा मृत्यू, आई रोजंदारी—पण तिच्या बुद्धिमत्तेला पंख देत पाटील दाम्पत्याने तिला मुलीसारखे सांभाळले. आज तिला वारणानगर येथील बीडीएस शाखेत प्रवेश मिळाल्याने त्यांच्या सेवाभावाला मोठे यश मिळाले आहे.
वयोवृद्ध, एकाकी आणि दुर्बल महिलांची जेवण–राहण्याची सोय करणे, निराधारांना शासकीय योजना मिळवून देणे, अन्यायग्रस्तांसाठी तालुका व जिल्हा स्तरावर लढा देणे—असे असंख्य उपक्रम ते विनामोबदला राबवत आहेत. “समाजाकडून आम्ही कधीच आर्थिक मदत घेत नाही; फुले दांपत्याच्या विचारांचा वसा पुढे नेण्याची बुद्धी परमेश्वर देतो, हेच आमचे खरे समाधान”—असे पाटील सांगतात.
भविष्यातही सर्वसामान्यांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत राहण्याची त्यांची भूमिका असून, समाजमनात त्यांच्या सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त होत आहे.