डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डॉ. सुनील रायकर यांना* *‘आयएसटीई’चा उत्कृष्ट संशोधक पुरस्कार*
schedule20 Feb 25 person by visibility 38 categoryराजकीय

*
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सुनील जयसिंग रायकर यांना इंडीयन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई), नवी दिल्लीकडून राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट संशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंजाबमधील रोपड येथील लॅमरिन टेक स्किल युनिव्हर्सिटी येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) चे अध्यक्ष डॉ. टी. जी. सीतारामन आणि आयएसटीईचे अध्यक्ष डॉ. प्रताप के. देसाई यांच्या हस्ते डॉ. रायकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी पंजाबचे अर्थमंत्री श्री. हरपाल सिंह चीमा यांच्यासह नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि टाटा टेक्नॉलॉजीसचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
डॉ. रायकर यांची रिसर्च पेपर्स, युरोपियन वैज्ञानिक व तांत्रिक सहकार्य परिषदेतील तांत्रिक तज्ञ म्हणून योगदान, हंगेरीच्या नॅशनल रिसर्च, डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन ऑफिसमधील कार्य, विविध जागतिक डेटाबेसेससाठी समीक्षक म्हणून कार्य, महत्त्वपूर्ण संदर्भ, पेटंट्स, तांत्रिक आणि वैज्ञानिक विषयांवरील पुस्तके, तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मुख्य भाषणे, 3D प्रिंटिंग क्षेत्रातील संशोधन यासाठी या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी फ्युझ्ड डिपोझिशन मॉडेलिंग (FDM) तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध औद्योगिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी महत्त्वाचे संशोधन केले आहे.
डॉ. रायकर म्हणाले, "या सन्मानामुळे माझ्या संशोधन आणि नवोपक्रमाच्या कार्याला अधिक बळ मिळेल. हा केवळ माझा गौरव नसून डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा गौरव आहे. या पुरस्काराबद्दल मी एआयसीटीई व आयएसटीईचे मनःपूर्वक आभार मानतो."
या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी डॉ रायकर यांचे अभिनंदन केले.