प्राधिकरणाने ४२ गावांचा ‘मास्टर प्लान’ तयार करावा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर*
schedule17 Feb 25 person by visibility 26 categoryराजकीय

*प्राधिकरणाने ४२ गावांचा ‘मास्टर प्लान’ तयार करावा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर*
- बदलत्या कोल्हापूरची सुंदरता कायम राहण्यासाठी नियोजन आराखडा तयार करा
- चौकशीच्या अनुषंगाने अहवालातील दोषींवर कारवाई करा, कामे वेळेत पूर्ण करावीत अन्यथा कारवाई
- प्राधिकरण कार्यालयातील सर्व पदसंख्या तत्काळ भरा
*कोल्हापूर, दि.१७* : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाने प्राधिकरणातील समाविष्ट ४२ गावांचा चांगला ‘मास्टर प्लान’ तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री तथा अध्यक्ष कोल्हापूर नगारी क्षेत्र विकास प्राधिकरण समिती प्रकाश आबिटकर यांनी दिले. मास्टर प्लान तयार करीत असताना यासाठी अनुभवी व तांत्रिकदृष्ट्या सक्षम संस्थेची मदत घेवून चांगला आराखडा तयार करा. हे नियोजन करीत असताना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारत्मकता ठेवून आणि जबाबदारीने पुढिल दोनशे वर्षांचा विचार करून एक व्हीजन डॉक्यूमेंट तयार करावे अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या. यावेळी प्राधिकरणाच्या कामकाजाबाबतचे सादरीकरण सदस्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण संजयकुमार चव्हाण यांनी केले. या बैठकीला आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी महसूल डॉ.संपत खिलारी उपस्थित होते.
आत्ताच जिल्हाधिकारी यांनी केलेल्या चौकशीच्या अनुषंगाने अहवालातील दोषींवर कारवाई करा, कामे वेळेत पूर्ण करावीत अन्यथा कारवाई करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना बदला असे निर्देशही पालकमंत्री श्री.आबिटकर यांनी दिले. प्राधिकरणाने शहरालगतच्या ४२ गावांमध्ये एक चांगला आराखडा तयार करून कोल्हापूर चांगल्या पद्धतीने उभे करणे आवश्यक होते परंतु फारसे यामध्ये प्राधिकरणाने लक्ष घातल्याचे दिसून येत नाही. यापुढिल बैठकीत प्राधिकरणाने लोकप्रतिनीधी, स्थानिक नागरिक, तज्ञांचा सल्ला घेवून ४२ गावांचे एक चांगले सादरीकरण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करावे असे निर्देश पालकमंत्री श्री.आबिटकर यांनी दिले. ते म्हणाले, अनाधिकृत बांधकामांबाबत केलेल्या कारवाईबाबतही अहवाल सादर करावा. या ४२ गावातील सार्वजनिक जागांचे नियोजन करून तिथून उत्पन्न कसे घेता येईल यासाठी नियोजन करा. तसेच यापुढे दर महिन्याला प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनाधिकृत कामे थांबविणे, नवीन कामांना मंजुरी देणे, सनियंत्रण करणे अशा महत्त्वाच्या दैनंदिन कामांबरोबर नव्याने विकासात्मक कामे हाती घेणे या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडा असे पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले. आमदार अमल महाडिक यांनी मार्च अखेर नियोजन करून चांगला आराखडा तयार करण्याचे सांगितले तर आमदार चंद्रदीप नरके यांनी १०० दिवसांच्या मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमामध्ये याचा समावेश करून पुढिल तीन महिन्यात प्राधिकारण कार्यालयाच्या कामाला गती देणे गरजेचे आहे असे सांगितले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्राधिकरण कार्यालयाला मंजुर पदसंख्येनूसार सर्व रिक्त पदांची भरती करण्याचे निर्देश दिले. सद्या फक्त ११ जण कार्यरत असून १६ रीक्त जागा आहेत. आवश्यकता पडल्यास कंत्राटी पदभरती करून अनुभवी व कौशल्यप्राप्त नियुक्ती करण्याचे आदेशही त्यांनी दिले. शहरालगतच्या गावांचा विकास व्हावा म्हणूनच प्राधिकरणाची सुरूवात झाली असून त्यांनी उद्देशानूसार कामे करून कोल्हापूरलगतच्या सर्व गावांसाठी पुढिल दोनशे वर्षासाठीचे व्हीजन तयार करावे असेही त्यांनी बैठकीत संबंधित विभागाला सूचित केले. यावेळी प्राधिकरणाच्या कामकाजाबाबतचे सादरीकरण सदस्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणचे संजयकुमार चव्हाण यांनी केले. ते म्हणाले, प्राधिकरण स्थापनेमागचा उद्देश कोल्हापूर महानगरपालिकेच्या लगतच्या गावांमध्ये जलद गतीने होत असलेल्या नागरीकरणांमुळे परिसराचा सुनियोजित व सुनियंत्रित पद्धतीने विकास होणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्यामुळे शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ४२ मधील तरतूदीनुसार करवीर तालुक्यातील ३७ व हातकणंगले तालुक्यातील ५ अशी एकूण ४२ गावांसाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. प्राधिकरणाचे एकूण क्षेत्र महानगरपालिका वगळून १८६.१३ चौ. कि. मी. आहे. समाविष्ट ४२ गावात येत्या काळात दिलेल्या सूचनांनुसार सर्व बाबींचा विचार करून पुढील उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले.
००००००