गोकुळमध्ये राष्ट्रवादीच ‘मोठा भाऊ’; जागावाटपाचा तिढा चर्चेतून सुटेल : हसन मुश्रीफ
schedule11 Sep 26 person by visibility 13 category
एमपीएससी पेपरफुटी प्रकरण गंभीर; दोषींवर कारवाई होईल
ऊसदरावर शेतकरी संघटनेशी चर्चा करणार; माधुरी हत्तीणीचे स्वागत करूया
कोल्हापूर, दि. 12 सप्टेंबर : गोकुळ दूध संघाची आगामी निवडणूक महायुती म्हणूनच लढविणार असून, गोकुळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच ‘मोठा भाऊ’ आहे, असा दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. गोकुळच्या जागावाटपाचा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला असून, चर्चेतून त्यावर योग्य तो मार्ग निघेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर विमानतळावर शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना मुश्रीफ बोलत होते.
गोकुळच्या अपात्र होता होता वाचलेल्या १,४२० संस्था सभासदांनी ‘अदृश्य शक्तींसोबत जाणार नाही’, अशी भूमिका घेतल्याबाबत विचारले असता, “मी आत्ताच विमानतळावर उतरलो आहे. याबाबत मला काही माहिती नाही. चर्चेतून मार्ग निघेल,” असे त्यांनी सांगितले.
गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असल्याचा पुनरुच्चार करताना मुश्रीफ म्हणाले, “हे सगळे सदस्य महायुतीचेच असताना असे का होत आले आहे, हे मला आजही अनाकलनीय आहे. याचे उत्तर मलाही सापडलेले नाही. यातून सामंजस्याने मार्ग काढू.”
राज्यात महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ असल्याचे खासदार धनंजय महाडिक सांगत आहेत, याबाबत विचारले असता ते म्हणाले, “राज्यामध्ये मोठा भाऊ भाजपच आहे; परंतु गोकुळ दूध संघामध्ये मोठा भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आहे.”
महायुतीमध्ये पालकत्वाची भूमिका आपणच घेतली आहे का, या प्रश्नावर त्यांनी मिश्कील प्रतिक्रिया देत, “इतर सगळे म्हणत आहेत की हसन मुश्रीफ बोलत आहेत, तर पुन्हा आपण कशाला बोला,” असे म्हटले.
एसआयटीवर टीका करणे हे विरोधकांचे काम
एमपीएससी परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणाबाबत मुश्रीफ म्हणाले, हे प्रकरण महायुती सरकारने आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घेतले आहे. परीक्षार्थी मुलांच्या मनात “आम्ही कष्ट करतो, मरमर मरतो आणि अशा पद्धतीने अन्याय होतो,” अशी भावना निर्माण झाली आहे. ही भावना दूर करण्याची गरज आहे. परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी तसेच चुका करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री पावले उचलतील, असे त्यांनी सांगितले.
एसआयटी चौकशीला आमदार रोहित पवार ‘टाईमपास’ म्हणत असल्याबाबत विचारले असता मुश्रीफ म्हणाले, “अशा प्रकरणात चौकशी समिती नेमल्याशिवाय काहीही निष्कर्ष काढता येणार नाही. सरकारने कोणतीही कृती केली की त्यावर टीका करणे हे विरोधकांचे काम आहे. ते काम ते प्रामाणिकपणे करीत आहेत.”
ऊसदरावरून शेतकरी संघटनेशी चर्चा
१५ ऑक्टोबरपासून साखर हंगाम सुरू करण्याच्या निर्णयाला ऊसदरावरून शेतकरी संघटनांचा विरोध असल्याबाबत ते म्हणाले, गेल्या वर्षी प्रतिटन ३,४०० रुपये देण्यात आले होते. त्यातील १०० रुपये देणे बाकी होते, ते अनेक कारखाने देत आहेत.
साखरेच्या दरातील वाढ कृत्रिम होती. दोनच दिवस दर वाढला आणि आता तो पुन्हा खाली आला आहे. साखरेच्या वाढलेल्या दराच्या आधारावर ऊसदराची मागणी केली जात असेल तर शेतकरी संघटनेशी चर्चा करावी लागेल. कारखान्यांना या दरवाढीचा फारसा फायदा झालेला नाही, हे त्यांना समजावून सांगावे लागेल, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने योग्य एफआरपी देत असून, जिल्ह्यात एफआरपीची थकबाकी राहिलेली नाही, असा दावाही त्यांनी केला.
१५ ऑक्टोबरच्या गळीत हंगामाबाबत चर्चेनंतर निर्णय
महाराष्ट्रात सणासुदीच्या काळात साखरेची मोठी टंचाई निर्माण झाली होती. साखरेचा दर प्रतिकिलो ६० ते ७० रुपयांपर्यंत पोहोचल्यानंतर सरकारला १५ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करण्याचे पाऊल उचलावे लागले. आता शेतकरी संघटनेशी चर्चा करून शासनाची भूमिका त्यांच्यासमोर मांडण्यात येईल आणि त्यानंतर निर्णय होईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
पुण्यातील पार्थ पवार यांच्या जमीन प्रकरणाबाबत विचारले असता, “हे न्यायालयीन प्रकरण आहे. यावर बोलणे उचित ठरणार नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतली.
‘माधुरी’ हत्तीणीचे स्वागत करूया
माधुरी हत्तीण परत येत असल्याबाबत विचारले असता मुश्रीफ म्हणाले, “माधुरी हत्तीणीचे आपण सर्वजण मिळून स्वागत करूया. ज्याप्रमाणे तिचे वनतारामध्ये पालन-पोषण झाले, त्याच पद्धतीने तिचे पालन-पोषण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.”