ग्रामीण भागाच्या विकासासाठी समाज कल्याण विभाग कटिबद्ध: सभापती श्रद्धा गायकवाड
schedule12 May 26 person by visibility 25 categoryराजकीय
कोल्हापूर: आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषद समाज कल्याण समितीची पहिली मासिक सभा मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी सभापती मा. सौ. श्रद्धा अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी बोलताना त्यांनी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याचा, विशेषतः ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे ग्वाही दिली.
सभेच्या प्रारंभी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सचिव श्री. राजेंद्र माने यांनी नूतन सभापती व समितीच्या सर्व सन्माननीय सदस्यांचे रोप आणि संविधानाची फोटो फ्रेम देऊन स्वागत केले.
योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश
सभापती श्रद्धा गायकवाड यांनी जिल्हा परिषद स्वनिधी आणि शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. "जिल्ह्याचा विकास साधताना सर्व सदस्यांचे सहकार्य मोलाचे ठरेल. जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करावे," असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पुढील सभेत महत्त्वाच्या योजनांवर निर्णय
या बैठकीत जिल्हा परिषद स्वनिधीमधील विविध योजना आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या योजनांबाबतचे ठोस निर्णय पुढील सभेत घेतले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मा. सचिन साळे यांनी वस्ती विकास योजनांबाबत, तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. अतुल आकुर्डे यांनी जिल्हा परिषद स्वनिधीबाबत मार्गदर्शन केले. या सभेस समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.