थेट पाइपलाइन पुईखडी येथे जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी सुरू
आवाज इंडिया न्यूज
कोल्हापूर (एम. डी. पाटील)
काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेचा सोमवारी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. धरणातून येणारे पाण्याचे फिल्टरायझेशन करण्यासाठी बांधण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात आज पाणी सोडण्यात आले. पुढील दीड ते दोन महिने ट्रायल टेस्टिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाणी वितरण करण्यात येणार आहे. मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम केवळ आठ टक्के शिल्लक असून यापुढे केवळ जॅकवेल बांधणीच्या कामावर लक्ष देण्यात येणार आहे.
२०४५ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरुन शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजना हाती घेण्यात आली. योजनेला अडथळांचा नेहमीच सामना करावा लागला आहे. परिणामी ही योजना टिकेची धनी बनली आहे. सभागृह आणि सभागृहाबाहेर योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. वारंवार होणारी राजकीय टिकाटिपणी थांबवण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीची पाहणी केली होती. दौऱ्यानंतर योजनेची वस्तुनिष्ठ माहिती मांडताना २०२१ पर्यंत योजना मार्गी लावण्याचा आश्वासन देण्यात आले होते. पण करोनाच्या नव्या संकटामुळे योजनेच्या कामात अडथळा निर्माण झाला. या गंभीर स्थितीमध्येही ठेकेदार जीकेसी कंपनीने जलशुद्धीकरण केंद्राचे काम मार्गी लावण्यात यश मिळवले आहे. सुपरवायझर व अभियंता राजेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली जलशुद्धीकरण केंद्राचे काम मार्गी लावण्यात आले आहे. सोमवारी शिंगणापूर योजनेचे पाणी केंद्रामध्ये सोडून ट्रायल घेण्यात आली. पुढील दोन महिने ट्रायल टेस्टिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर नव्या शुद्धीकरण केंद्रांतून पाणी वितरण करण्यात येणार आहे. आज टेस्टिंग केल्यानंतर उपस्थितीत कर्मचारी व महापालिका पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
धरण ते पुईखडीपर्यंत टाकण्यात येणाऱ्या ४९ किमी पाइपलाइन पैकी केवळ आठ टक्के पाइप टाकण्याचे काम बाकी राहिले आहे. मुख्यत्वे सोळांकुर येथील पाइपलाइन टाकण्याचे काम प्रलंबित राहिले असून लवकरच यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे. तर नाधवडे येथील इलेक्ट्रिकल काम आठवड्यात मार्गी लागणार आहे. ही दोन्ही किरकोळ स्वरुपाची कामे वगळता उर्वरीत जॅकवेलच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे. अन्य काम पूर्ण झाल्याने जॅकवेलच्या कामाला पुढील काही दिवसात गती येण्याची शक्यता आहे.