सेवेचा व संवेदनशीलतेचा समतोल : सुमेधा प्रभू इंगळे
schedule22 Jan 26 person by visibility 59 categoryसामाजिक
कोल्हापूर :
इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असणाऱ्या अधिपरिचारिका सुमेधा प्रभू इंगळे या केवळ एक आरोग्यसेविका नाहीत, तर त्या संवेदनशील सामाजिक भान जपणाऱ्या एक समर्पित व्यक्तिमत्त्व आहेत. मूळच्या अकोला येथील असलेल्या सुमेधा इंगळे सध्या कराड–विटा–इस्लामपूर परिसरात आपली निष्ठेने सेवा बजावत आहेत.
रुग्णसेवा हेच आपले जीवनकार्य मानत त्यांनी नर्सिंगच्या क्षेत्रात स्वतःला झोकून दिले आहे. उपजिल्हा रुग्णालयातील दैनंदिन कामकाज करताना रुग्णांशी मायेने संवाद साधणे, त्यांच्या वेदना समजून घेणे आणि उपचारांसोबत मानसिक आधार देणे ही त्यांची खास ओळख आहे. “सेवा हीच खरी साधना” हा विचार प्रत्यक्ष कृतीतून त्या साकार करताना दिसतात.
सुमेधा इंगळे यांना सामाजिक कार्याची विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनात असतानाच त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. वंचित, दुर्लक्षित आणि गरजू घटकांसाठी मदतीचा हात पुढे करणे हे त्यांनी नेहमीच अग्रक्रमाने केले आहे. आरोग्यविषयक जनजागृती, गरिबांना मदत, तसेच मानवी मूल्यांची जोपासना करणाऱ्या उपक्रमांमधून त्यांचे सामाजिक भान सातत्याने प्रकट झाले आहे.
यासोबतच त्या साहित्यिक जाणिवाही जपतात. महाविद्यालयीन काळात त्यांनी अनेक ललित कविता सादर केल्या असून त्यांच्या कवितांमधून जीवनाविषयीची संवेदनशीलता, माणुसकी आणि आशावाद व्यक्त होतो. सेवा आणि सृजनशीलता यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो.
सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन विविध संस्थांकडून त्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले आहे. हा गौरव त्यांच्या कार्याची पोचपावती ठरत असून, पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरतो.
रुग्णसेवा, सामाजिक बांधिलकी आणि साहित्यिक अभिव्यक्ती यांचा समतोल साधणाऱ्या सुमेधा प्रभू इंगळे या आजच्या तरुण पिढीसाठी इंगळे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या हातून घडणारे कार्य समाजासाठी प्रेरणास्थान ठरो, हीच सदिच्छा.