दौलत साखर कारखान्यात त्रिपक्षीय वेतन करार लागू करा;
schedule19 Aug 26 person by visibility 79 categoryराजकीय
कामगार युनियनचे साखर आयुक्तांना निवेदन
चंदगड:
हलकर्णी (ता. चंदगड) येथील 'दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना' (सध्या भाडेतत्त्वावर: अथर्व इंटरट्रेड प्रा. लि.) मधील सुमारे दीड हजार कामगारांना सुधारित त्रिपक्षीय वेतन करार (२०२४-२०२९) तात्काळ लागू करावा, या मागणीसाठी 'चंदगड तालुका साखर कामगार युनियन'ने (CITU) साखर आयुक्त (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडे धाव घेतली आहे. युनियनचे अध्यक्ष प्रा. आबासाहेब चौगले यांच्या स्वाक्षरीचे निवेदन आयुक्तालयात सादर करण्यात आले आहे.
प्रादेशिक सह संचालक (साखर), कोल्हापूर यांनी ७ ऑगस्ट २०२६ रोजी कारखाना प्रशासनाला त्रिपक्षीय कराराची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कारखाना व्यवस्थापन या आदेशांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कामगार संघटनेने केला आहे.
मुख्य मागण्या:
- १०% वेतनवाढ: अकुशल ते उच्च कुशल अशा १२ वेतनश्रेणींमधील सर्व कामगारांना १०% वेतनवाढीचा थेट लाभ चालू महिन्यापासून देण्यात यावा.
- थकीत फरक (Arrears): मागील कालावधीतील वेतनवाढीचा फरक व जुन्या व्यवस्थापनाकडील प्रलंबित कायदेशीर देणी जास्तीत जास्त दोन हप्त्यांत अदा करावीत.
कामगारांच्या या न्याय्य मागण्यांवर त्वरित प्रशासकीय आदेश देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.