कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिनकर आवळे यांची संघर्षमय वाटचाल
schedule05 May 26 person by visibility 18 categoryराजकीय
कोल्हापूर :आवाज इंडिया
कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष तसेच कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभाग सेवकांची सहकारी पतसंस्थेचे नेते संचालक दिनकर बाबुराव आवळे यांनी आपल्या कर्तृत्वाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज ते ६९ व्या वर्षात पदार्पण करत असून, त्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला असता संघर्ष, जिद्द आणि प्रामाणिकपणाची प्रेरणादायी कहाणी समोर येते.
आवळे यांचे बालपण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत गेले. आर्थिक अडचणींमुळे त्यांना केवळ सातवीपर्यंत शिक्षण घेता आले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरी परिसरात बाजारात मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. लहान वयातच कष्टाची सवय लागल्याने त्यांनी जीवनातील अडचणींवर मात करण्याचा निर्धार केला.
महानगरपालिकेत नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच अर्ज केला होता, मात्र वय अपूर्ण असल्याने त्यांना संधी मिळाली नाही. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हंगामी कर्मचारी म्हणून केवळ ९ रुपये दिवसाच्या मजुरीवर काम सुरू केले. सुरुवातीच्या काळात कचरा उचलणे, स्वच्छता करणे, झाडू कामगार अशी विविध कामे त्यांनी तब्बल पाच वर्षे प्रामाणिकपणे केली.
१९८४ साली त्यांनी कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभाग सेवकांची सहकारी पतसंस्थेत आपले पॅनल निवडून आणत नेतृत्वाची धुरा स्वीकारली. गेली ४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी या संस्थेचे नेतृत्व करत संस्थेला स्थैर्य आणि प्रगतीच्या दिशेने नेले आहे. विशेष म्हणजे या संस्थेची आतापर्यंत तीन वेळा बिनविरोध निवड झाली आहे.
संस्थेच्या वतीने सभासदांना विविध भेटवस्तू दिल्या जातात. सध्या ठेवींवर ९ टक्के व्याज तर 14 टक्के लाभांश (डिव्हिडंड) दिला जात आहे. गतवर्षी संस्थेला ६३ लाख ९६ हजार रुपयांचा नफा झाला असून, मागील वर्षी १० कोटी ८४ लाख १३ हजार ९०० रुपयांच्या ठेवी जमा झाल्या होत्या. या यशामागे संचालक मंडळाचे एकत्रित काम आणि योग्य नियोजन असल्याचे आवळे यांनी नमूद केले आहे.
एकूणच, दिनकर आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेची यशस्वी घोडदौड सुरू असून, त्यांच्या कार्याचा आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा! 🎉